राज्यात वादळी पाऊस; वीज पडून ११ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 02:49 IST2021-05-03T02:48:52+5:302021-05-03T02:49:27+5:30
केळी, द्राक्षबागा उद्ध्वस्त; पिकांचे नुकसान

राज्यात वादळी पाऊस; वीज पडून ११ ठार
लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा/बीड : राज्यात रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात वीज कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जणावरे दगावली. वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा, केळीच्या बागा, द्राक्षबागा उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कवठे (सातारा) येथे रविवारी दुपारी शेतातील झोपडीवर वीज कोसळून शशिकांत लिमन व खाशाबा जाधव या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज पडून दोन महिला जागीच ठार झाल्या. यात एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेतामध्ये शेळी-मेंढी घेऊन चारण्यासाठी गेलेले वसाडी बुद्रुक येथील अनंत श्रीकृष्ण बोडके (३२) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. परभणीत वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील भोर येथे सीमा अरुण हिलम (११) व अनिता सिंकदर मोरे (९, दोघी रा. चेलाडी) यांचा मृत्यू झाला. तर परभणीत २ अल्पवयीन मुलांसह ५५ वर्षीय गंगाधर रामभाऊ होरगुळे यांचा वीज पडून मृत्यू झाला. जळगावात एकाचा मृत्यू झाला.
सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्याने विजेची तार पत्र्यावर पडल्याने शेडमधील शेळी ठार झाली. येथील केळीच्या बागा, द्राक्षबागा उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कोल्हापूरमध्ये रविवारी चारनंतर आलेल्या वादळी पावसाच्या हलक्या सरींनी गारव्याची फुंकर घातली. बीड जिल्ह्यात चंदन सावरगाव येथे शेतातील घरावर वीज पडल्याने सोयाबीन, हरभरा, गहू धान्य, पाइप, मोटारसायकलसह कडबा गंजी जळून खाक झाली. लातूर जिल्ह्यात वीज पडून बैलजोडी, म्हैस ठार झाली. हिंगाेली जिल्ह्यात सायंकाळी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नंदुरबारसह परिसरात पावसाचा शिडकावा झाला. गडचिराेलीत गारपिटीमुळे धान पिकाचे नुकसान झाले.