Sangli: चांदोलीत वाघाची डरकाळी; खुंदलापूर परिसरात आढळले ठसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:54 IST2025-11-01T12:23:19+5:302025-11-01T12:54:03+5:30
व्याघ्र प्रकल्पासाठी आनंददायी बाब, सतर्कता गरजेची

Sangli: चांदोलीत वाघाची डरकाळी; खुंदलापूर परिसरात आढळले ठसे
वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली अभयारण्यात वाघाची डरकाळी पुन्हा एकदा घुमू लागली आहे. खुंदलापूरलगतच्या मानवी वस्तीजवळ वाघाच्या पायांचे ठसे आढळल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा वावर वाढल्याने व्याघ्र प्रकल्पासाठी ही आनंददायी बाब मानली जात आहे.
खुंदलापूर, जनीचा आंबा या पर्यटन मार्गावर काही युवकांना वाघाच्या पायांचे ठसे दिसले. त्यांनी त्याचे छायाचित्र पुराव्यादाखल दाखवले आहे. वन विभागाला याची माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी डरकाळ्या ऐकू आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
चांदोलीत यापूर्वीच ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाले होते. आता पुन्हा ठसे आढळल्याने वाघ मानवी वस्तीकडे सरकत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. खुंदलापूर धनगरवाडा, शेवताई मंदिर, मणदूर धनगरवाडा, विनोबाग्राम व सिद्धेश्वरवाडी परिसरातील ग्रामस्थांत वाघाच्या अस्तित्वाची चर्चा रंगली आहे.
सतर्कता गरजेची
वाघ मानवी वस्तीपर्यंत पोहोचला आहे की नाही, याबाबत अद्याप निश्चितता नसली, तरी ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वन्यजीव संवर्धनासोबतच मानवी जीविताचे रक्षण हेही तितकेच महत्त्वाचे असल्याने अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वाघाच्या वावरासंदर्भात अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. आमचे कर्मचारी घटनास्थळी पाठवून पाहणी करत आहोत. ठशांचे फोटो आमच्या तज्ज्ञ टीमकडे विश्लेषणासाठी पाठविले आहेत. चांदोलीत वाघ असल्याचे खरे असले, तरी तो मानवी वस्तीपर्यंत आला असल्याबाबत सध्या निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र, या भागात बिबट्यांचा वावर आहे. - ऋषिकेश पाटील, वनक्षेत्रपाल, चांदोली