मेघगर्जनेसह पावसाने सांगली जिल्ह्याला झोडपले; डाळिंब, द्राक्षाचे मोठे नुकसान

By अशोक डोंबाळे | Updated: June 12, 2025 19:35 IST2025-06-12T19:35:18+5:302025-06-12T19:35:34+5:30

आज मुसळधार पावसाचा अंदाज : सांगली, मिरज शहरात सर्वत्र पाणीच पाणी

Thunderstorms and rains hit Sangli district; Pomegranates, grapes suffer major damage | मेघगर्जनेसह पावसाने सांगली जिल्ह्याला झोडपले; डाळिंब, द्राक्षाचे मोठे नुकसान

मेघगर्जनेसह पावसाने सांगली जिल्ह्याला झोडपले; डाळिंब, द्राक्षाचे मोठे नुकसान

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्याला हवामान विभागाने दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर गुरुवारी दमदार पावसाला सुरुवात झाली. सकाळी जोरदार पावसानंतर दुपारपर्यंत उघडीप दिली होती. मात्र दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पावसाने झोडपून काढले. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज, तासगाव तालुक्यातील मुसळधार पाऊस झाला. सांगली, मिरज शहरात जोरदार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचून राहिले होते. दरम्यान, शुक्रवारी, दि. १३ मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्याला चार दिवस पावसाने उघडीप दिली होती. परंतु दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई हवामान विभागाने व्यक्त केला होता. गुरुवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. काही वेळ पावसाच्या सरी बसरल्यानंतर सकाळी १० वाजल्यानंतर पावसाने उघडीप घेतली. मात्र उष्म्यात वाढ झाली होती.

दुपारी तीननंतर मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरी मोठ्या असल्याने काही वेळातच पाणीच पाणी झाले. वाळवा तालुक्यातील आष्टा, बावची, बागणी, तांदूळवाडी, बहादूरवाडी, बोरगाव, नेर्ले भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले. शिराळा तालुक्यात पावसाचा जोर राहिला. तेथील बहुतांशी गावात पाऊस सुरूच राहिला. मिरज तालुक्यातील तुुंग, कसबेडिग्रज, समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, मौजे डिग्रज, नांद्रे परिसरात जोराच्या पावसाने हजेरी लावली. तासगाव शहरासह मांजर्डे, विसापूर, पेड, वायफळे, बलगवडे, बस्तवडे, मणेराजुरी, कवठेएकंद, कुमठे आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला.

शहरात जनजीवन विस्कळीत

सांगली शहरात दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले. सायंकाळी सुरू झालेल्या जोराच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. काँग्रेस कमिटी, मारुती रोड, भाजी मंडई, स्टँड परिसर, मार्केट यार्ड परिसर, स्टेशन चौक, सिटी पोस्ट चौकांत पाणी साचले होते, मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती.

डाळिंब, द्राक्षाचे मोठे नुकसान

गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचून राहिले आहे. पाऊस उघडीप घेत नसल्यामुळे द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने द्राक्ष, डाळिंबासह अन्य फळपिकांच्या नुकसानीत मोठी वाढ होणार आहे.

चोवीस तासांत ५ मि.मी. पाऊस

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मिरज २.०९ मिलिमीटर, जत २.८, खानापूर ४.१, वाळवा ५.६, तासगाव ६.३, शिराळा ७.६, आटपाडी ३.५, कवठेमहांकाळ ४.४, पलूस ४.५ आणि कडेगाव तालुक्यात ८.२ मि.मी पाऊस झाला.

Web Title: Thunderstorms and rains hit Sangli district; Pomegranates, grapes suffer major damage