कारंदवाडीत जाळीत अडकलेल्या मगरीच्या सुटकेचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 18:49 IST2020-12-12T18:47:06+5:302020-12-12T18:49:08+5:30

crocodile , wildlife, sangli कृष्णाकाठावर गेल्या काही वर्षांत मगर व माणसांचा संघर्ष तीव्र झाला आहे. या दोहोंकडून परस्परांचे प्राण घेण्यापर्यंत घडामोडी घडल्या आहेत. पण अनेकदा मगरींना जीवदान देण्याची भूतदयादेखील नागरीकांनी दाखविली आहे. कारंडवाडीमध्ये (ता. वाळवा) येथील शेतकर्यांनी शुक्रवारी असेच प्राणीप्रेम दाखवत एका मगरीची जाळीतून सुटका केली.

The thrill of releasing a crocodile trapped in a net in Karandwadi | कारंदवाडीत जाळीत अडकलेल्या मगरीच्या सुटकेचा थरार

कारंदवाडीत जाळीत अडकलेल्या मगरीच्या सुटकेचा थरार

ठळक मुद्देकारंदवाडीत जाळीत अडकलेल्या मगरीच्या सुटकेचा थरारमच्छिमारांचा उत्साह मगरींच्या जीवावर

सांगली : कृष्णाकाठावर गेल्या काही वर्षांत मगर व माणसांचा संघर्ष तीव्र झाला आहे. या दोहोंकडून परस्परांचे प्राण घेण्यापर्यंत घडामोडी घडल्या आहेत. पण अनेकदा मगरींना जीवदान देण्याची भूतदयादेखील नागरीकांनी दाखविली आहे. कारंडवाडीमध्ये (ता. वाळवा) येथील शेतकर्यांनी शुक्रवारी असेच प्राणीप्रेम दाखवत एका मगरीची जाळीतून सुटका केली.

कारंदवाडीमधील हाळभागात शेतकरी प्रभाकर पाटील हे कृष्णा नदीत मोटारीच्या कामासाठी गेले असता पाण्यात तडफडणारी मगर त्यांना दिसली. मच्छिमारांनी मासे पकडण्यासाठी पूर्ण पात्रात नदीला आडवी जाळी लावली होती. प्रवाहासोबत पोहत आलेली मगर जाळीत अडकली. सुटण्यासाठी धडपड करताना आणखी फसत गेली.

प्रभाकर पाटील व अभिजित पाटील यांनी तिच्या सुटकेसाठी प्रयत्न केला. काईलीतून नदीच्या पलीकडील तिरावर गेले. तेथून जाळे कापले. जाळ्यासह मगरीला पात्राबाहेर जमिनीवर आणले. पण माणसांची चाहूल लागताच मगर हिंस्त्र बनू लागली, त्यामुळे तिला जाळीतून सोडविणे पाटील यांना शक्य झाले नाही. त्यांनी सांगतील ॲनिमल राहत संस्थेला कळविले. तेथून कार्यकर्ते येईपर्यंत मगरीच्या चेहर्यावर टॉवेल टाकून शांत करण्याचा प्रयत्न केला.

राहतच्या कौस्तुभ पोळ, योगेश इनामदार, प्रसाद सूर्यवंशी यांनी मगरीवर नियंत्रण मिळवित जाळी कात्रीने कापली. विशेषत: तिच्या तोंडाजवळची जाळी कापणे धाडसाचेच होते. सुमारे पाच फूट लांबीच्या मगरीची अर्ध्या-पाऊण तासांनंतर सुटका झाली. जाळी पूर्ण निघाल्याची खात्री झाल्यानंतर टॉवेल काढण्यात आला. त्याचक्षणी तिने नदीपात्राकडे धाव घेतली.

मच्छिमारांचा उत्साह मगरींच्या जीवावर

कृष्णा नदीपात्रात सध्या मुबलक पाणी असल्याने मासेमारीला उधाण आले आहे. अशास्त्रीय पद्धतीने मासेमारी होत असल्याने मगरींचे प्राण धोक्यात येताहेत. दोनच दिवसांपूर्वी अंकलखोपमध्येही कृष्णेत एका जाळ्यात मोठी मगर अडकल्याचे दिसून आले, तिची सुटका अजूनही झालेली नाहीजाळ्यात अडकलेल्या स्थितीतच ती नदीपात्रत वावरत आहे.

Web Title: The thrill of releasing a crocodile trapped in a net in Karandwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.