Sangli: भाटशिरगाव येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी, डोक्यावर शंभरहून अधिक मधमाश्यांचे डंक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:03 IST2025-12-17T18:01:01+5:302025-12-17T18:03:51+5:30
ऊसतोडणीचे काम सुरू असताना मधमाश्यांनी अचानक भीषण हल्ला केला

Sangli: भाटशिरगाव येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी, डोक्यावर शंभरहून अधिक मधमाश्यांचे डंक
शिराळा : भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील सावळ्याच्या वस्तीनजीक असणाऱ्या म्हसोबा मंदिराजवळ (मळीच्या ओढ्याजवळ) ऊसतोडणीचे काम सुरू असताना मंगळवारी मधमाश्यांनी अचानक भीषण हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी महेश अलुगडे, सुरेश अलुगडे व सुजाता अलुगडे यांना डोक्यावर शंभरहून अधिक मधमाश्यांचे डंक बसल्याने ते गंभीर जखमी झाले.
त्यांना पुढील उपचारांसाठी ईश्वरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवार, दि. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता घडली. सामाजिक कार्यकर्ते श्रीराम नांगरे रुग्णवाहिका घेऊन तातडीने पोहोचल्याने पुढील उपचारांसाठी मोठी मदत झाली.
याबाबत माहिती अशी, भाटशिरगाव येथे सावळ्याच्या वस्तीनजीक ऊसतोड सुरू आहे. सायंकाळी मधमाश्यांनी अचानक हल्ला करून वरील तिघांना गंभीर जखमी केले. यावेळी ग्रामस्थांनी श्रीराम नांगरे पाटील यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी अवघ्या दहा मिनिटांत तिथे जाऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तिघांच्याही शरीरावरील काटे काढण्यात यश आले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध काकडे आणि सहकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले. परिस्थिती गंभीर झाल्याने तिघांना ईश्वरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मधमाश्यांचे काटे काढून उपचार करण्यात आले. यावेळी तानाजी माने, आविष्कार पाटील, विनोद मोहिते, बाबासाहेब माने, सौरभ माने, अक्षय सटाले, विश्वास देसाई यांनी धाव घेऊन जखमींना उपचारांसाठी मदत केली.