भिंत कोसळली, पत्रे उडाले; म्हैसाळ येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:39 IST2025-05-05T13:29:16+5:302025-05-05T13:39:16+5:30
मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात तीनजण जखमी झाले आहेत.

भिंत कोसळली, पत्रे उडाले; म्हैसाळ येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात तिघे जखमी
सुशांत घोरपडे
म्हैसाळ :- म्हैसाळ येथे शेडबाळ रस्ता मळाभाग परीसरात गॅस गळती झाल्याने गॅसचा सिलेंडरचा स्फोट होऊन तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या स्फोटत सुर्यकांत वनमोरे(४४),मयुरी वनमोरे(३६),प्रिया वनमोरे(१३),सर्व रा.म्हैसाळ हे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, म्हैसाळ येथे शेडबाळ रोड मळा परीसरात वनमोरे कुटुंब राहते. सकाळी सुर्यकांत वनमोरे हे अंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गेले असता गॅस सुरू करताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. उन्हाचा कडाका जोरदार सुरू असतानाच हा स्फोट झाल्याने त्याची तीव्रता आणखी वाढली. रात्रभर गॅसची गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. स्फोट इतका भयंकर होता की घराच्या भिंती कोसळल्या व घरावरील पत्रे उडून गेले. घरातील फर्निचर, कपाट,फँन,व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रात्रभर गॅस गळती होऊन स्फोट झाला असल्याची शक्यता आहे. हा स्फोट मोठा आहे. जखमीवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी दिली.