दुधेभावीत चिकुनगुन्यासदृश आजाराचे तीनशेवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:58 IST2021-09-02T04:58:38+5:302021-09-02T04:58:38+5:30

कवठेमहांकाळ : दुधेभावी (ता. कवठेमहांकाळ) येथे चिकुनगुन्यासदृश साथीचे रुग्ण माेठ्या प्रमाणात आढळून येत असताना, ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील आरोग्य ...

Three hundred patients with chikungunya-like disease in lactation | दुधेभावीत चिकुनगुन्यासदृश आजाराचे तीनशेवर रुग्ण

दुधेभावीत चिकुनगुन्यासदृश आजाराचे तीनशेवर रुग्ण

कवठेमहांकाळ : दुधेभावी (ता. कवठेमहांकाळ) येथे चिकुनगुन्यासदृश साथीचे रुग्ण माेठ्या प्रमाणात आढळून येत असताना, ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील आरोग्य विभाग कोमात आहे. गावात तीनशेवर रुग्ण आढळल्याने गावकरी चिंताग्रस्त झाले आहेत. गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असल्याने सादिक खाटीक, बंटी दुधाळ यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सादिक खाटीक म्हणाले, गेली महिनाभर दुधेभावी गावात चिकुनगुन्यासदृश रोगाचे थैमान सुरू आहे. ग्रामस्थांनी तसेच एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने ग्रामसेवकाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. गावातील गटारी सांडपाण्याने तुंबल्या आहेत. याबाबतही ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या हाेत्या. परंतु ‘आमच्याकडे गटारी स्वच्छ करायला माणसे नाहीत.’ अशी बेजबाबदार उत्तरे ग्रामसेवकाने दिली. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढत गेले आणि चिकुनगुन्यासदृश रोगाचा फैलाव झाला.

गेल्या महिन्याभरात दुधेभावीत तीनशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण उपचारासाठी जत तालुक्यातील बेवणूर येथील एका खासगी रुग्णालयात गेल्यानंतर ग्रामपंचायतीचा कारभार समाेर आला. दुधेभावी गावात घाणीचे साम्राज्य व गटारी तुंबल्या आहेत. शिवाय अख्ख्या गावाला या चिकुनगुन्यासदृश रोगाने विळखा घातला आहे.

दुधेभावी गाव ढालगाव येथील आरोग्य केंद्राअंतर्गत येते. परंतु या आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची पुसटशीही कल्पना नाही. दुधेभावीत साथीच्या रोगाचा फैलाव होण्यास कारणीभूत ग्रामसेवक, आरोग्य विभागातील अधिकारी, तसेच ग्रामपंचायतीचे बेजबाबदार कारभारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. समाजमाध्यमांमध्ये याबाबत माहिती पसरल्यानंतर ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी बुधवारी गटारी स्वच्छ करण्यास सुरुवात केली.

Web Title: Three hundred patients with chikungunya-like disease in lactation