मिरजेत नशेची औषधे विकणारे तिघे ताब्यात, सव्वासहा लाखांची औषधे जप्त; सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

By संतोष भिसे | Updated: January 21, 2025 16:31 IST2025-01-21T16:30:45+5:302025-01-21T16:31:52+5:30

सांगली : मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी केलेल्या एका महत्वाच्या कारवाईत तब्बल सव्वासहा लाखांची प्रतिबंधित औषधे जप्त केली. त्यांचा ...

Three arrested for selling drugs in Miraj, seized drugs worth 6 lakhs | मिरजेत नशेची औषधे विकणारे तिघे ताब्यात, सव्वासहा लाखांची औषधे जप्त; सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

मिरजेत नशेची औषधे विकणारे तिघे ताब्यात, सव्वासहा लाखांची औषधे जप्त; सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

सांगली : मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी केलेल्या एका महत्वाच्या कारवाईत तब्बल सव्वासहा लाखांची प्रतिबंधित औषधे जप्त केली. त्यांचा वापर नशेसाठी केला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.

याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. पै. रोहित अशोक कागवाडे (वय ४४, रा. शामरावनगर, आकांक्षा मेडिकलच्या वरील बाजूस, सांगली, ओंकार रवींद्र मुळे (वय २४,रा. गव्हर्मेंट कॉलनी, विश्रामबाग, सांगली) आणि आशपाक बशीर पटवेगार (वय ५०, रा. असुबा हॉटेलसमोर, पत्रकारनगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. यापैकी रोहित कागवाडे हा मेडिकल चालक आहे. त्याच्या नावे औषधविक्रीचा परवाना असल्याचे घुगे यांनी सांगितले. ही कारवाई सोमवारी (दि. २०) रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास मिरजेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पिछाडीला करण्यात आली.

घुगे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. यावेळी अपर अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरिक्षक सतीश शिंदे, गांधी चौक पोलिस ठाण्यातील सहायक निरिक्षक संदीप शिंदे उपस्थित होते. मिरजेत काही संशयित नशेसाठी औषधांची विक्री करत असल्याची माहिती गांधी चौकी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात सोमवारी सायंकाळी सापळा लावला. 

उद्यानाच्या मागील बाजूस दोघे संशयित येऊन थांबले. त्यांनी पिशवीतील साहित्याची देवाणघेवाण केली. त्याचवेळी त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. रोहितकडील पिशवीत मेफेनटर्माइन इंजेक्शनच्या २८ कुप्या व ओंकारकडील पिशवीत २३ कुप्या सापडल्या. औषध निरिक्षक राहुल कारंडे यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. रोहित व ओंकार यांनी ही औषधे सांगलीतील आशपाक पटवेगार याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता १२३, २७८, ३(५) या कलमांसह औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधने अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

एका कुपीमागे ४४० रुपये नफा

संशयितांनी सांगितले की, एका कुपीची कमाल किरकोळ किंमत ३६० रुपये आहे. त्यांची विक्री ८०० रुपयांना केली जाते. एका कुपीमागे ४४० रुपये नफा मिळतो.

पटवेगारच्या घरात साठा

या औषधांचा साठा आशपाक पटवेगार याच्या सांगलीतील घरात करण्यात आला होता. पोलिसांनी झडती घेतली असता घरात दुसऱ्या मजल्यावर बॉक्समध्ये विविध कंपन्यांच्या १३६० कुप्या सापडल्या. विविध कंपन्यांच्या गोळ्यांची १७६ पाकिटेही हाती लागली. घरासमोरील चारचाकीत ९६ कुप्या सापडल्या. एकूण ६ लाख १६ हजार ६४१ रुपये किंमतीची औषधे, गोळ्या, एक चारचाकी व एक दुचाकी असा एकूण १४ लाख ४६ हजार ६४१ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

भूकवर्धक व कामोत्तेजक औषधे

घुगे यांनी सांगितले की हे औषध नशेसाठी इंजेक्शनद्वारे शरीरात घेतले जाते. डॉक्टरांकडून रुग्णांना भूक वाढीसाठी ते दिले जाते, पण गुन्हेगारांकडून त्याचा वापर नशेसाठी होतो. ही औषधे व गोळ्या कामोत्तेजकही आहेत.

परवाना रद्दची शिफारस

घुगे यांनी सांगितले की, या औषध विक्रेत्याचा परवाना रद्दची शिफारस अन्न व औषध प्रशासनाकडे करणार आहोत. या व्यवसायात मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. औषधे संशयितांना विनापरवाना विकणारे व खरेदी करणारे यांचाही शोध घेणार असून त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील. औषधे घेणाऱ्या ग्राहकांचाही शोध घेतला जात आहे. गुन्हा उघडकीस आणणाऱ्याा पथकाला बक्षीस दिले जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

घुगे यांनी सांगितले की, अंमली पदार्थ श्रेणीतील ही आजवरची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे. यापूर्वी जत, कवठेमहांकाळ येथेही कारवाया करण्यात आल्या होत्या. अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिस आक्रमक कारवाया करत आहेत.

Web Title: Three arrested for selling drugs in Miraj, seized drugs worth 6 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.