Sangli: प्रशासनाला दिलासा, पंचायत राज समितीचा दौरा या वर्षीदेखील नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 18:15 IST2025-10-21T18:14:25+5:302025-10-21T18:15:09+5:30
२०१८ पासून दौरा नाही, सध्या अतिवृष्टी आणि निवडणुकांचे कारण

Sangli: प्रशासनाला दिलासा, पंचायत राज समितीचा दौरा या वर्षीदेखील नाहीच
सांगली : यंदाच्या पावसाळी हंगामातील अतिवृष्टी आणि आगामी निवडणुकांची आचारसंहिता यामुळे या वर्षीही पंचायत राज समिती येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. किंबहुना विधिमंडळाच्या सर्वच समित्यांनी दौरे रद्द करावेत, असे आदेश सचिवालयाने काढल्यानेही या वर्षी पंचायत राज समिती येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
समिती येणार नसल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये समिती सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती. त्यानंतर काही ना काही कारणांनी तिचा दौरा लांबत गेला. कोरोनाकाळात ती आलीच नाही. २०२२ पासून जिल्हा परिषदेत प्रशासकराज आहे. या कालावधीतही समिती या ना त्या कारणांनी लांबत गेली. २०२५ मध्ये ती येण्याची शक्यता होती, पण गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे विधिमंडळ समित्यांनी कोणतेही दौरे काढू नयेत, असे फर्मान सचिवालयाने काढले आहेत.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणारे विधिमंडळ समित्यांचे दौरे पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आले आहेत असे आदेशात म्हटले आहे. समित्यांचे दौरे सुरू झाले असते, तर त्यांच्या तयारीत प्रशासन मोठ्या प्रमाणावर अडकून पडले असते. त्याचा प्रतिकूल परिणाम शेतकरी व पूरग्रस्त नागरिकांच्या मदतकार्यावर झाला असता. त्यामुळे समित्यांचे दौरे रद्द करून प्रशासनावरचा ताण कमी करण्याचा निर्णय सचिवालयाने घेतला.
सध्या पाऊस थांबला असला, तरी निवडणुकांचा हंगामा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका, नगर पंचायती, नगर परिषदा, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आणि तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा मुहूर्त लागू शकतो. सध्या प्रशासन या निवडणुकांच्या तयारीत आहेत. आगामी चार-पाच महिने अधिकारी, कर्मचारी यातच अडकून पडणार आहेत. त्यामुळेही यावर्षी पंचायत राज समिती येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावर्षी धाकधूक नाही
पंचायतराज समिती दौऱ्यावर येणार असते, त्या वेळी महिना-दोन महिन्यापासून जिल्हा परिषदेला तयारी करावी लागते. विभागनिहाय प्रलंबित फायलिंगसह विविध अपूर्ण कामांचा निपटारा करण्याकडे कल असतो. समितीकडून उपस्थितीत होणाऱ्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने अद्ययावत माहिती तयार करावी लागते. समिती येणार म्हटल्यावर सर्वांचीच धांदल उडते. सध्या मात्र यातून सुटका मिळाली आहे.