Sangli Politics: गाडगीळ यांचा लेटरबॉम्ब, खाडेंचा सुरात सूर; पालकमंत्र्यांविरुद्ध कलह उफाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 19:01 IST2025-10-31T19:00:40+5:302025-10-31T19:01:09+5:30
आमदारांच्या आरोपाला काय उत्तर देणार? याकडे लक्ष

Sangli Politics: गाडगीळ यांचा लेटरबॉम्ब, खाडेंचा सुरात सूर; पालकमंत्र्यांविरुद्ध कलह उफाळला
सांगली : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या सांगली-मिरजेच्या आमदारांनी थेट विरोधाची आघाडी उघडली आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर येऊ लागला आहे. आमदारांच्या आरोपाला पालकमंत्री काय उत्तर देणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक पातळीवर निष्ठावंत कार्यकर्ते बाजूला पडत असून बाहेरून आलेल्या आयारामांना प्राधान्य दिले जात असल्याची नाराजी आमदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध आयाराम’ अशी लढाई रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी भाजपने सहा महिन्यापूर्वीच हालचाली सुरू केल्या होत्या. त्याच मोहिमेत काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांना भाजपात दाखल करून घेण्यात आले. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे भाजपचा आकडा वाढला, मात्र अस्वस्थतेचा ज्वालामुखीही पेटला. याचा प्रत्यय बुधवारी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या लेटरबाॅम्बमधून भाजप कार्यकर्त्यांना आला.
वाचा: भाषणात बोललेले किती खरे, हे तुम्हीच ठरवा; सुरेश खाडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर उभे केले प्रश्नचिन्ह 
दिवाळीच्या आधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. तेव्हा निवडून आलेल्या नगरसेवकांना उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांची उमेदवारी निश्चित मानली जाऊ लागली. पण त्याच प्रभागातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र कोंडी झाली.
गेली पाच वर्षे नगरसेवक पदासाठी तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले. यातील बहुतांश कार्यकर्ते सुधीर गाडगीळ यांचे समर्थक मानले जातात. आपल्या गटालाच हादरे बसल्याने स्वत: गाडगीळ मैदानात उतरले आहेत. त्यांनी थेट पालकमंत्र्यांविरोधातच आघाडी उघडली. सहा नगरसेवक पक्षात आले असताना २२ तिकिटे कुणाला देणार, असा सवाल चंद्रकांत पाटील यांना केला. गाडगीळ यांच्या पाठोपाठ मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनीही चंद्रकांतदादांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे.
वाचा : संजयकाकांचा भाजपवर डाव, पालकमंत्र्यांचा बालेकिल्ल्यात पट
दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी सांगली दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते आमदारांच्या आरोपांना कोणते उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाटील यांच्या भूमिकेवरूनच पक्षातील पुढील समीकरणे ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
भाजपात निष्ठावंत विरुद्ध आयाराम संघर्ष होणार
आमदारांच्या भूमिकेमुळे पक्षात नव्याने एन्ट्री केलेले कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. दुसरीकडे पालकमंत्र्यांच्या वक्तव्याने निष्ठावंत नाराज आहेत. त्यामुळे भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध आयाराम असा संघर्ष होणार आहे. या घडामोडींचा थेट परिणाम महापालिका निवडणुकीवर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, पक्षात समन्वय राखण्यासाठी उच्च पातळीवर हस्तक्षेप आवश्यक असल्याचे मत कार्यकर्त्यांमध्ये आहे.