Sangli Politics: राजकीय आखाड्यात आयाराम-गयारामांची गर्दी; गावोगावी पक्षप्रवेशाचे सोहळे, तिकिटासाठी डावपेच सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:54 IST2025-11-03T15:51:49+5:302025-11-03T15:54:13+5:30
तिसऱ्या आघाडीचा पर्याय

Sangli Politics: राजकीय आखाड्यात आयाराम-गयारामांची गर्दी; गावोगावी पक्षप्रवेशाचे सोहळे, तिकिटासाठी डावपेच सुरु
संतोष भिसे
सांगली : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागताच विविध पक्षांत आयाराम-गयारामांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणच्या सर्रास राजकीय कार्यक्रमांत पक्षप्रवेशाचे सोहळे रंगत आहेत. निवडणुका स्वतंत्र लढणार की महायुती व महाविकास आघाडी म्हणून अद्याप निर्णय झालेला नाही. तरीही प्रमुख राजकीय पक्षांत प्रवेशासाठी गर्दी होऊ लागली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवार निश्चित झाले आहेत. महिला आरक्षण असेल, तेथे नेतेमंडळींनी आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. तब्बल आठ वर्षांनंतर निवडणुका होत असल्याने इच्छुकांची संख्या खूपच मोठी आहे. साहजिकच सर्वच पक्षांच्या नेत्यांना तिकीट वाटपावेळी मोठ्या कसरतीला तोंड द्यावे लागणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, मुंबई महापालिका वगळता अन्यत्र निवडणुका स्वतंत्र लढल्या जातील. गरजेनुसार त्या-त्या ठिकाणी निवडणूकपूर्व युती केली जाईल. निवडणुकीनंतर सत्तेसाठी हातमिळवणी केली जाईल. फडणवीस यांच्या वक्तव्याची अंमलबजावणी झाली, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुती म्हणून लढल्या जाणार नाहीत हे स्पष्ट आहे. स्वाभाविकच इच्छुकांना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, रिपाइं अशा वेगवेगळ्या पक्षांतून संधी मिळणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांना यंदा तिकिटे मिळण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीतून एकत्र किंवा स्वतंत्र लढतीबाबत वेगवेगळ्या भूमिका जाहीर केल्या जात असल्याने स्थानिक स्तरावरील इच्छुक संभ्रमात आहेत. त्यांनी स्वत:च्या ताकदीवर लढण्याची तयारी सुरू केली आहे. चांगले मतदान मिळविण्यासाठी एखाद्या पक्षाचे पाठबळ मिळाले, तर त्याचा फायदा होतो हे लक्षात घेऊन पक्षीय वळचणीला जाण्याचे सर्वच इच्छुकांचे प्रयत्न आहेत; पण पक्षांच्या भूमिका निश्चित होत नसल्याने कार्यकर्त्यांची गोची झाली आहे.
तिसऱ्या आघाडीचा पर्याय
महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या भूमिका निश्चित होत नसतानाच माजी खासदार संजय पाटील यांनी तिसऱ्या आघाडीतून जिल्हा परिषद व पंचायत समित्या लढविण्याची तयारी सुरू केली आहे. भाजप किंवा अन्य कोणत्याच पक्षात पाठबळ नसलेल्या उमेदवारांकडून या आघाडीचा विचार सुरू आहे.
कार्यकर्ते वेटिंगमध्ये..?
जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षांतरे जोरात सुरू झाली आहेत. भाजपमध्ये तर आम्हाला पक्षप्रवेश देता का ? अशी विचारणाऱ्यांची रांग लागल्याचे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यातून पक्षात अस्वस्थतेचे वातावरणही आहे. पक्षामध्ये स्थानिक स्तरावर विविध गटही तयार झाले आहेत. याचे फायदे-तोटे प्रत्यक्ष निवडणुकीत दिसणार आहेत.