भाजपमध्ये भांडण नाही, आमच्यात बिबा घालू नका - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:56 IST2025-11-01T15:56:33+5:302025-11-01T15:56:53+5:30
पक्षाचा विस्तार काहींना बघवत नाही

भाजपमध्ये भांडण नाही, आमच्यात बिबा घालू नका - चंद्रकांत पाटील
सांगली : राज्यात भाजप हा सर्वात वेगाने वाढणारा आणि क्रमांक एकचा पक्ष आहे. त्यामुळे काहींना हे बघवत नाही. सांगलीतच नव्हे तर पुण्यातसुद्धा दररोज काहीतरी उठाठेव सुरू असते. सांगलीसारख्या ठिकाणी आमच्यात बिबा घालण्याचा अशक्य प्रयत्न झाला; मात्र आमच्यात कोणतेही भांडण नाही. महापालिका निवडणुकीत कोणावरही अन्याय होणार नाही, असे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षांतर्गत वादावर पडदा टाकला.
भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे यांनी निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांवरील अन्यायाविरोधात थेट पालकमंत्र्यांवर निशाणा साधला होता. शुक्रवारी (दि. ३१) जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपमधील अंतर्गत वादाच्या चर्चांवर भाष्य केले.
ते म्हणाले की, ‘महापालिका निवडणुकीतील उमेदवारीबाबत सुधीर गाडगीळ यांना स्पष्टता दिली आहे. आमच्यात कोणतेही भांडण नाही. तुम्ही भांडू नका म्हणून सर्वसामान्य लोक अस्वस्थ आहेत; पण आमचा पक्ष संघटित आहे. जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, वैभव पाटील, अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी मूळ पक्षसंघटनेची ताकद कायम आहे.
सांगली महापालिकेत भाजपच्या ४३ जागा निवडून आल्या. त्यात कोणतीही तडजोड होणार नाही. कोल्हापुरात ताराराणी आघाडीसह ३३ जागा आहेत आणि तिथेही तडजोड होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. घटक पक्ष व भाजपसोबत येणाऱ्या पक्षांच्या विद्यमान नगरसेवकांचा सर्व्हे करून उमेदवारी निश्चित ठरवू.
सांगलीत निवडणूक होऊन सात वर्षे झाली असून, या काळात विद्यमान नगरसेवक अध्यक्ष चांगले लोक तयार झाले आहेत. त्यांचाही विचार केला जाईल. आरक्षण सोडत झाल्यानंतर आठ-दहा दिवसांत पक्षाचा सर्वे होईल. जयश्री पाटील यांच्या २२ नगरसेवकांपैकी सहाजण भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे भाजपचे ४३ व जयश्री वहिनींचे ६ अशी मिळून ४९ जागा निश्चित आहेत. याशिवाय राष्ट्रवादी अजित दादा गटासोबत किती नगरसेवक आहेत हे बघावे लागेल. जनसुराज्यनेही काही जागांची मागणी केली आहे, मात्र भाजपच्या कोणावरही अन्याय होणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
पक्ष मेरिटवर चालतो
महापालिका जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांसाठी अनेक संधी निर्माण होतात. स्वीकृत नगरसेवक, शिक्षण मंडळ, परिवहन, वृक्ष समिती तसेच विविध महामंडळांमध्ये संधी उपलब्ध होतील. आमचा पक्ष मेरिटवर चालतो, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.