जागतिक ब्रदर्स डे: कुठे संघर्षाचा वारा, तर कुठे भाईचारा; सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आमदारांच्या बंधुत्वाचे नाते बळकट
By अविनाश कोळी | Updated: May 24, 2025 16:20 IST2025-05-24T16:01:30+5:302025-05-24T16:20:46+5:30
पडद्यामागे राहून भावाच्या यशाकरीता योगदान

जागतिक ब्रदर्स डे: कुठे संघर्षाचा वारा, तर कुठे भाईचारा; सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आमदारांच्या बंधुत्वाचे नाते बळकट
अविनाश कोळी
सांगली : घर सामान्य माणसाचे असो वा राजकीय नेत्याचे, बंधुत्वाचे रंग सर्वत्र सारखेच दिसतात. कधी प्रेमाचे भांडण, कधी मायेचा ओलावा. कधी आधारवड, तर कधी त्यागाचे पाऊल टाकत नात्याचा हा प्रवास अखंड सुरू असतो. बदलत्या सामाजिक परिस्थितीत भाऊबंदकीचा राक्षस मोठा होत असला, तरी बंधुत्वाच्या अवकाशापुढे तो खुजाच ठरतो. जिल्ह्यातील राजकारण्यांचे विश्व बंधूप्रेमाच्या कहाण्यांनी व्यापले आहे. अपवादात्मक ठिकाणी संघर्षाचे काटे दिसून येताहेत.
उद्योग, व्यावसाय, सहकारी संस्था, शेती असे भक्कम आर्थिक स्रोत निर्माण केल्याने अनेक नेत्यांनी राजकारणात पाय घट्ट रोवले आहेत. संस्था, उद्योगाची धुरा खांद्यावर घेणाऱ्या त्यांच्या बंधुंमुळे जिल्ह्यातील बहुतांश आमदारांना राजकारणात घट्ट पाय रोवून उभे राहता आले. त्यांच्या राजकारणातल्या यशामागे बंधूंचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. राष्ट्रीय बंधू दिवसानिमित्त आमदारांच्या बंधुप्रेमावर टाकलेला हा प्रकाशझोत..
जयंत पाटील यांचा बंधुभाव
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व त्यांचे थोरले बंधू भगतसिंह पाटील यांच्यात कमालीचा प्रेमभाव दिसून येतो. शैक्षणिक व सहकारी संस्थांचा भार भगतसिंह सांभाळत आहेत. राजकीय पदांवर त्यांनी कधीही दावेदारी केली नाही.
सुरेश खाडे यांचे ‘दास’प्रेम
माजी पालकमंत्री व मिरजेचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांना अशोक व दत्तात्रय असे दोन मोठे भाऊ होते. दत्तात्रय यांचे निधन झाले असून, आता दोघे भाऊ एकत्र असतात. तिन्ही भावांच्या अद्याक्षरानुसार त्यांनी ‘दास’ नावाची संस्था स्थापन केली. यावरून भावांमधील प्रेमाचे भावविश्व दिसून येते.
सुहास बाबर यांना अमोल साथ
खानापूर मतदारसंघाचे शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांना त्यांचे मोठे भाऊ अमोल बाबर यांची साथ आहे. राजकीय कार्यकर्त्यांचा संच, जनसंपर्क, तसेच संस्थात्मक स्तरावरची सर्व जबाबदारी अमोल बाबर सांभाळतात.
गोपीचंद-ब्रम्हानंद जोडी
जतचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व त्यांचे मोठे बंधू ब्रम्हानंद दोघेही राजकारणात सक्रीय आहेत. जिल्हा परिषदेत सभापती म्हणून ब्रम्हानंद यांनी काम केले. गोपीचंद यांच्या कार्यकर्त्यांचा संच सांभाळण्याचे कामही तेच करतात.
गाडगीळ बंधुंनी जपला भाईचारा
सांगलीतील भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांचे लहान बंधू गणेश गाडगीळ यांनी नेहमीच संस्थात्मक जबाबदारी सांभाळत भावाला राजकारणात साथ दिली. दोन्ही भावांमध्ये चांगला समन्वय दिसून येतो.
खासदारांना भावाची साथ
वसंतदादांचे नातू खासदार विशाल पाटील यांना त्यांचे मोठे बंधू प्रतीक पाटील यांची साथ आहे. दिवंगत खासदार प्रकाशबापू पाटील यांच्या पश्चात राजकीय वारसा प्रतीक यांना लाभला होता. त्यांनी केंद्रीय राज्य मंत्रीपदापर्यंत मजल मारली. पण, अचानक कनिष्ठ बंधू विशाल यांच्यासाठी ते राजकारणापासून दूर झाले. निवडणुकांच्या काळात पडद्यामागची सर्व सुत्रे प्रतीक पाटील सांभाळत असतात.
नायकवडी बंधुंमध्ये संघर्ष
मिरजेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे मोठे बंधू माजी नगरसेवक अय्याज नायकवडी पूर्वीपासून काँग्रेसमध्ये आहेत. दोघांमध्ये सतत राजकीय संघर्ष दिसून आला. राजकारणात प्रदीर्घ काळापासून त्यांच्या वाटा वेगळ्या आहेत.
थोरल्या भावांचा त्याग, धाकट्यांकडे नेतृत्व
खासदार विशाल पाटील यांच्यासह जयंत पाटील, सुरेश खाडे, सुहास बाबर, गोपीचंद पडळकर, इद्रिस नायकवडी हे सारे आमदार घरात धाकटे आहेत. यातील खासदार व चार आमदारांच्या थोरल्या बंधूंनी पडद्यामागे राहण्याचा निर्णय घेतल्याने धाकट्यांकडे नेतृत्व आले आहे.