सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बँकांचा हात आखडता, वितरणात किती कोटींची तफावत.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:14 IST2025-09-18T16:13:50+5:302025-09-18T16:14:21+5:30

रब्बी हंगामासाठी बँकांना किती कोटींचे उद्दिष्ट.. वाचा

There is a gap of Rs 546 crore in the distribution of Kharif crop loans in Sangli district | सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बँकांचा हात आखडता, वितरणात किती कोटींची तफावत.. जाणून घ्या

सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बँकांचा हात आखडता, वितरणात किती कोटींची तफावत.. जाणून घ्या

सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांसाठी पीक कर्जाचे २ हजार १३ कोटी ३० लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. पण, ऑगस्टअखेर पीककर्जाचे १ हजार ४६७ कोटी ३५ लाख कर्जाचे वाटप केले आहे. खरीप पीककर्ज वितरणात ५४६ कोटी रुपयांची तफावत आहे. पुढच्या महिन्यापासून रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वितरण सुरू होईल, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील जिल्हा बँक, राष्ट्रीय, व्यापारी बँका, खासगी, ग्रामीण बँकांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील ऊस, सोयाबीन यासह डाळिंब, द्राक्ष पिकांसाठी पीककर्ज दिले आहे. २०२५च्या खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेसाठी ९३ हजार ३६७ शेतकऱ्यांना १ हजार १३३ कोटी ५६ लाख कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. १ लाख १६ हजार ७०९ शेतकऱ्यांना १ हजार ४८ कोटी ९२ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा बँकेकडूनच सर्वाधिक पीककर्ज वाटप झाले आहे. राष्ट्रीय, व्यापारी बँकांना ४७ हजार ५५१ शेतकऱ्यांना ५७८ कोटी ३१ लाख उद्दिष्ट होते. त्यापैकी केवळ १३ हजार ८२४ शेतकऱ्यांना ३०३ कोटी ८९ लाख रुपये कर्ज वाटप झाले आहे. 

खासगी बँकांसाठी २४ हजार २९४ शेतकऱ्यांना २९५ कोटी ८२ लाख कर्ज वाटपाचे उद्दिष्टापैकी २ हजार ४१५ शेतकऱ्यांना ११० कोटी ९२ लाख रुपये वाटप केले. ग्रामीण बँकांना ४५३ शेतकऱ्यांना ५ कोटी ६१ लाख उद्दिष्ट असताना केवळ २१५ शेतकऱ्यांना ३ कोटी ६२ लाख रुपये वाटप केले आहे. पीककर्ज वाटपात बहुतांश बँकांनी हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे. खरिपासाठी सप्टेंबरअखेर कर्ज वितरीत केले जाते. अर्थात अद्याप कर्ज वितरणासाठी १३ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे ९० टक्क्यांपर्यंत कर्ज वितरण होईल, असा अंदाज जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने व्यक्त केला.

रब्बी हंगामासाठी १,३४२ कोटींचे बँकांना उद्दिष्ट

रब्बी हंगामातील कर्ज वितरण ऑक्टोबरपासून सुरू होईल. रब्बी हंगामात १ लाख १२ हजार १८७ शेतकऱ्यांना १ हजार ३४२ कोटी ३९ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेला ३२ हजार ९९३ शेतकऱ्यांना ७५५ कोटी ७९ लाखाचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय, व्यापारी बँकांना ३२ हजार २०७ शेतकऱ्यांना ३८५ कोटी ६० लाख, खासगी बँकांसाठी १६ हजार ६६६ शेतकऱ्यांना १९७ कोटी २६ लाख आणि ग्रामीण बँकांना ३२१ शेतकऱ्यांना ३ कोटी ७४ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे.

ऑगस्टअखेर खरीप हंगामातील पीककर्ज वितरण स्थिती

बँक /सभासद संख्या / रक्कम

जिल्हा बँक - १,१६,७०९ / १०४८.९२ कोटी
राष्ट्रीय, व्यापारी बँका - १३,८२४ / ३०३.८९ कोटी
खासगी बँका - २,४१५ / ११०.९२ कोटी
ग्रामीण बँका - २१५ / ३.६२ कोटी
एकूण - १,३३,१६३ / १४६७.६५ कोटी

Web Title: There is a gap of Rs 546 crore in the distribution of Kharif crop loans in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.