..तर निलंबित नाही बडतर्फ करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा
By घनशाम नवाथे | Updated: May 23, 2025 18:37 IST2025-05-23T18:36:51+5:302025-05-23T18:37:16+5:30
सांगलीत पोलिस अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटन

..तर निलंबित नाही बडतर्फ करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा
घनशाम नवाथे
सांगली : राज्यात अमलीपदार्थांच्या विरोधात ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम सुरू केली आहे. यामध्ये एखादा पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा सहभाग आढळल्यास त्याला निलंबित नव्हेतर बडतर्फ करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
सांगलीतपोलिस अधीक्षक कार्यालय व नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार जयंत पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सुहास बाबर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात पोलिस गृहनिर्माणसाठी पोलिस कार्यालय, निवासस्थानांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पोलिस संख्याबळाच्या तुलनेत ५० टक्के निवासस्थाने असावेत, असा नियम आहे. पूर्वी राज्यात हे प्रमाण ३० टक्के होते. परंतु गेल्या दहा वर्षात प्रयत्न केल्यामुळे ९४ हजार निवासस्थाने बांधली गेली. त्यामुळे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. चांगल्या दर्जाची घरे बांधली गेली. राज्यात १९६० मधील गरज ओळखून पोलिस कार्यालये बांधली गेली. आताच्या गरजा ओळखून तसेच लोकसंख्या, पोलिस ठाणे, कर्मचारी अशा सर्व गोष्टीचा आराखड्यानुसार पोलिस दलाची रचना केली आहे.
तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी
राज्यात ४० हजार पोलिसांची भरती केली. चांगल्या पोलिसिंगसाठी तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्याला फॉरेन्सिक व्हॅन दिली जाणार आहे. सांगलीत व्हॅनची वाट न पाहता फॉरेन्सिक सुविधा असलेल्या दुचाकी कार्यरत केल्या आहेत. तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यामध्ये फितुरीचा प्रश्न येत नाही. त्यामुळे त्यावर भर दिला आहे. नवीन कायद्यानुसार दोन महिन्यात आरोपपत्र दाखल होतील यासाठी प्रयत्न सुरू आहे. जेव्हा शिक्षेचे प्रमाण वाढते तेव्हाच गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती राहते. शिक्षेचे प्रमाण ७० ते ७५ टक्केपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अमलीपदार्थामुळे तरुण पिढ्या बरबाद होत आहेत. त्यामुळे त्याविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या महासंचालक अर्चना त्यागी, पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोज शर्मा, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, प्रभारी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शशिकांत माहुरकर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, नीता केळकर, सोनाई इन्फ्राचे श्रीनिवास पाटील, वास्तुविशारद मोहित चौगुले आदी उपस्थित होते.
पोलिस दल आणखी सुसज्ज करा
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिस दलाकडे अधिक लक्ष देऊन निधी उपलब्ध करून दिला आहे. अलीकडे गुन्हेगारांकडे वेगवेगळी साधने वाढत आहेत. त्यामुळे पोलिस दल आणखी सज्ज करण्यासाठी निधी खर्च करावा. ड्रग्जविरोधी अभियान यशस्वी सुरू आहे. त्याचबरोबर गावागावातील गुन्हेगारी कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत.
आटपाडी, कडेगाव ठाण्याचे उद्घाटन
जिल्हा पोलिस दलातील आटपाडी, कडेगाव पोलिस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन आणि सांगलीतील पोलिसांच्या २२४ निवासस्थानांचे भूमिपूजन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारा करण्यात आले.