..तर धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला लावतील - चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:32 IST2025-01-28T12:31:45+5:302025-01-28T12:32:25+5:30

मस्साजोग सरपंचांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरू

then Devendra Fadnavis will force Dhananjay Munde to resign says Chandrakant Patil | ..तर धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला लावतील - चंद्रकांत पाटील 

..तर धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला लावतील - चंद्रकांत पाटील 

सांगली : मस्साजोग (जि. बीड)चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यास समर्थ आहेत. त्यांना जर वाटले की, या प्रकरणात काही तथ्य आहे, तर ते ताबडतोब मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगतील, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिस यंत्रणा चौकशी करत आहे. एसआयटी नेमण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे. वाल्मीक कराड याच्यासह आरोपींना ‘मकोका’ लावण्यापर्यंत, तसेच वाल्मीक कराड याची संपत्ती जप्त करण्यापर्यंतची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. वाल्मीक कराड याला देखील ३०२ च्या गुन्ह्यात घेतील. मस्साजोग प्रकरणात कुणीही दोषी असले, तरी त्यांना मुख्यमंत्री सोडणार नाहीत.

..अन्यथा मीच रस्त्यावर उतरेन

सांगली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी फार मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. जे लोक ड्रग्जसंबंधी माहिती देतील. त्या माहितीच्या आधारे मुद्देमाल जप्त केला, तर माझ्या सॅलरी अकाउंटमधून १० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. ड्रग्जची कारवाई केली जातेच. नाही झाली, तरी मी रस्त्यावर उतरेन, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला.

जतचा दुष्काळ संपेल

दुष्काळामुळे जत तालुक्यात पिण्याचे आणि शेतीचे पाणी पुरेसे मिळत नव्हते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तेथील नागरिक कर्नाटकामध्ये जाण्यास इच्छुक होते, परंतु आता टेंभू, म्हैसाळ योजनेतून जत तालुक्याला प्रत्येक कानाकोपऱ्यात तलावात पाणी पोहोचण्याचे काम ६० टक्के झाले आहे. जत तालुक्यातील १०० टक्के दुष्काळ लवकरच संपेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारशी चर्चा करावी

चंद्रकांत पाटील म्हणाले, १८०० विद्यार्थ्यांनी केंद्राच्या ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटवर प्रवेश घेतला आहे. केंद्रात ईडब्ल्यूएस आहे. पण, महाराष्ट्रात मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिल्यानंतर ईडब्ल्यूएसमध्ये राहता येत नाही. परंतु, तरीही त्या विद्यार्थ्यांना या वर्षापुर्ते केंद्राचे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मान्य करून प्रवेश दिला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी आता मुंबईत येणे सुरू केले पाहिजे, तसेच शिष्टमंडळासह निवेदन घेऊन चर्चेला आले पाहिजे व येताना कायदेशीर बाजू माहिती असणारीच लोकं आणली पाहिजेत.

पालकमंत्री पदाचा वाद मिटेल

जिवंत माणसांमध्ये रुसवे-फुगवे असतात. कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुसवे-फुगवे संपवतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Web Title: then Devendra Fadnavis will force Dhananjay Munde to resign says Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.