प्रलंबित कामांबाबत विचारणा केल्याने महिलेस दमदाटी, नगरसेवकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 16:44 IST2022-03-19T16:43:57+5:302022-03-19T16:44:24+5:30
सांगली : शहरातील प्रभाग बारामधील प्रलंबित कामांबाबत विचारणा केली म्हणून एका महिलेस नगरसेवकाने शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार घडला. ...

प्रलंबित कामांबाबत विचारणा केल्याने महिलेस दमदाटी, नगरसेवकावर गुन्हा दाखल
सांगली : शहरातील प्रभाग बारामधील प्रलंबित कामांबाबत विचारणा केली म्हणून एका महिलेस नगरसेवकाने शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित महिलेने नगरसेवक संजय यमगर यांच्याविरोधात संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यमगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील माधवनगर रोड परिसरात असलेला प्रभाग क्रमांक १२ मध्ये फिर्यादी महिला कुटुंबीयांसह राहण्यास आहे. त्याच भागातील ड्रेनेज खुदाईचे काम सुरू असल्याने संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झाली आहे. ड्रेनेज कामामुळे एकीकडे रस्ते खराब असतानाच, गटारी, पथदिवेही नाहीत.
या समस्या सांगण्यासाठी संबंधित महिलेने भाच्याच्या मोबाईलवरून नगरसेवक यमगर यांना कॉल होता. यावेळी त्यांनी प्रलंबित कामाची विचारणा केली असता, मी तुमच्या भागात काम करणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा असे यमगर म्हणाले. यावरुन त्यांनी शिवीगाळ करत दमदाटीही केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत महिलेचा भाचा किरण गोसावी व भाऊ अशोक गोसावी यांनाही नगरसेवक यमगर यांनी शिवीगाळ केली. गुरुवारी (दि. १७) दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर संबंधित महिलेने संजयनगर पोलीस ठाण्यात यमगर यांच्याविरोधात फिर्याद दिली.