ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीलाच फायदा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:20 IST2025-12-15T17:19:44+5:302025-12-15T17:20:23+5:30
'भाजप छोटे पक्ष संपवितो, असा आरोप केला जातो, तो चुकीचा'

संग्रहित छाया
सांगली : मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईत उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे एकत्र आल्याने महायुतीला कोणताही फटका बसणार नाही. उलट अमराठी मतांचा फायदा महायुतीलाच होईल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. राज ठाकरे चांगले नेते आहेत, त्यांच्या सभांना मोठी गर्दी असते, पण त्यांना मते मिळत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
मंत्री आठवले रविवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागपूरमध्ये महायुतीचा निर्णय झाल्याचे सांगत, आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत रिपाइं एकत्र लढणार आहे. आम्ही २०१२ पासून एनडीए सोबत आहोत. एकही खासदार नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला दहा वर्षे मंत्रीपद दिले आहे. भाजप छोटे पक्ष संपवितो, असा आरोप केला जातो, तो चुकीचा असून, आम्ही नागालँड, मणिपूरपासून महाराष्ट्रापर्यंत पक्षाची वाढ केली आहे.
मुंबई महापालिका महायुतीसाठी महत्त्वाची असून, ठाकरेंच्या हातून महापालिका हिसकावून घेण्याचे नियोजन झाले आहे. मुंबईत महायुतीचा महापौर होईल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. रिपाइंने मुंबईत २५ जागांची तयारी केली आहे. त्यापैकी १५ ते १६ जागांची मागणी राहील, असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आल्याने अमराठी मते त्यांना मिळणार नाहीत, असा दावा करीत मुंबईत ४० टक्के मराठी मते आहेत.
मराठी मतात भाजप, काँग्रेस व ठाकरे यांचाही वाट असेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका ठाकरे बंधू विसरले आहेत. पूर्वी शिवसेनेने गुजराती सेना, उत्तर भारतीय सेना तयार केली. मुस्लिमांच्या मतांचे पाठबळ होते. मात्र, राज ठाकरे हे सोबत आल्याने उद्धव ठाकरे यांचे नुकसान होणार आहे. लोकसभा, विधानसभेचा दाखला देत आठवले म्हणाले की, लोकसभेवेळी राज ठाकरे महायुतीसोबत होते, त्यांचा फार फायदा झाला नाही. विधानसभेवेळी ते सोबत नव्हते, तेव्हा महायुतीने चांगले यश मिळविल्याचे त्यांनी सांगितले.
मतचोरीच्या आरोपाबाबत ते म्हणाले की, मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव अनेक ठिकाणी आहे. एकाच पत्त्यावर ४० हून अधिक लोकांची नावे आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार यादीत दुरुस्ती करावी, अशी रिपाइंची भूमिका आहे. मतचोरीबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आरोप चुकीचे आहेत. तसे असेल, तर लोकसभेवेळी मतचोरी झाली होती का?, असा सवालही त्यांनी केला. मतदार यादी दुरुस्तीसाठी एसआयआरचा निर्णय आयोगाने घेतल्याचे ते म्हणाले.
सांगलीत पाच ते सहा जागा मिळाव्यात
सांगली महापालिका निवडणुकीत रिपाइंला पाच ते सहा जागा मिळाव्यात, अशी मागणी राज्यमंत्री आठवले यांनी केली. सांगलीसाठी इच्छुकांची यादी तयार केली आहे. लवकरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत, असेही ते म्हणाले.