‘कैसे सुकून पाऊँ, तुझे देखने के बाद’; सांगलीत गझलांच्या चांदण्यात उजळली रात अजीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:56 IST2026-02-04T15:56:29+5:302026-02-04T15:56:50+5:30
नव्याच्या पौर्णिमेला तेजाळला सुरश्री महोत्सव, रसिकांचे सूरस्नान

‘कैसे सुकून पाऊँ, तुझे देखने के बाद’; सांगलीत गझलांच्या चांदण्यात उजळली रात अजीज
सांगली : नव्याच्या पौर्णिमेचा आकाशी तेजाळलेला चंद्र...त्याच्या शीतल प्रकाशात बहरलेली रात्र अन् या चांदणरातीला सांगलीच्या भूमीवर बहरलेली सूरपुष्पांची मैफल रसिकांच्या हृदयाला उजळवून गेली. सुंदर गझलांचे तलत (प्रकटणे) अन् अजीज (प्रिय) असणाऱ्या सदाबहार गझलांचा प्रवाह अनुभवत सांगलीकरांनी रविवारी सूरस्नान केले.
सांगलीच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर रंगलेल्या दोन दिवसांच्या सुरश्री महोत्सवाची सांगता रविवारी रात्री लोकप्रिय गझल गायक, संगीतकार तलत अजीज यांच्या स्वरवर्षावात झाली. ‘कैसे सुकून पाऊँ, तुझे देखने के बाद’ या गझलने त्यांनी मैफलीची सुरुवात करीत रसिकांना गुणगुणायला लावले. रसिकांची उपस्थितीत अन् गझलांना, वाद्यवादकांना मिळणारी दाद पाहून त्यांनी असे रसिक नशीबवान असलेल्या कलाकारांनाच मिळतात, असा प्रतिसाद दिला.
‘जिंदगी जब भी तेरी बझ्म में लाती है हमें, ये जमी चाँद से बेहतर नजर आती है हमें’ या शहरयार यांच्या ‘उमराव जान’मधील गझलेतून त्यांनी आकाशातील चंद्रमापेक्षा सांगलीच्या भूमीवरील ही मैफल सुंदर असल्याचे स्पष्ट केले. तल्लीन झालेले रसिक पाहून त्यांनी अलगदपणे ‘आज जाने की जिद ना करो’ ही या वातावरणाशी साजेशी गझल पेश करीत रसिकांना जणू आवाहनच केले.
‘बाजार’ चित्रपटातील ‘फिर छिडी रात बात फुलों की, रात है या बारात फुलों की’ या गाजलेल्या गझलेतून रंगलेल्या महोत्सवात बहर फुलविला. मेहंदी हसन यांच्या ‘रंजिश ही सही दिल दुखाने के लिये आ’ तसेच शबीना अदीब यांच्या ‘खामोश लब है झुकी है पलकें’ या गझलांनी त्यांनी मने जिंकली. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी नंतर ‘तुमको देखा तो ये खयाल आया’, ‘होंठों से छूलो तुम’, या गझला पेश केल्या. फिल्म ‘डॅडी’मधील ‘आईना मुझ से मेरी पहली सी सूरत माँगे’ या सुंदर गझलने त्यांनी मैफलीची सांगता केली.
तबल्यावर जितू शंकर जी, व्हायोलिनवर इकबाल वारसी, बासरीवर भास्कर दास आणि की बोर्ड वर शाहिद अजमेरा यांनी अतिशय सुंदर आणि समर्पक साथ केली.
खूप दिवसांनी अशी रसिकता अनुभवली
तलत अजीज यांनी सांगलीकरांच्या रसिकतेला दाद दिली. ‘खूप वर्षांनंतर असे दाद देणारे व समरस होणारे रसिक पाहिले. अशी मैफल व रसिक लाभणे हा नशिबाचा भाग असतो. त्यामुळे मी नशीबवान समजतो. आयुष्याच्या शेवटपर्यंत सांगलीचा हा महोत्सव घर करून राहील.’ अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.