राज्याला यशवंतरावांचाच विचार हवा, शरद पवार यांनी व्यक्त केलं मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 17:39 IST2024-09-06T17:38:03+5:302024-09-06T17:39:21+5:30
देवराष्ट्रेतील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकास भेट

राज्याला यशवंतरावांचाच विचार हवा, शरद पवार यांनी व्यक्त केलं मत
देवराष्ट्रे : यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचा पाया भक्कमपणे उभा केला. त्यांच्या विचारानेच शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र भक्कमपणे उभा राहिला. त्यामुळेच आजपर्यंत राज्याचा गाडा सुस्थितीत चालू आहे. यशवंतरावांच्या विचाराने यापुढे राज्यकारभार चालवला तरच राज्याचा विकास होईल, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
देवराष्ट्र येथील यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघर स्मारकाला पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी जुन्या छायाचित्रांची पाहणी केली. पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा समाजाला बरोबर घेऊन जाणारी होती. त्यामुळेच समाज एकसंध राहिला. त्यांच्या विचारांचे सरकार पुन्हा आणण्यासाठी माझे प्रयत्न आहेत.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अरुण लाड, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड आदी उपस्थित होते.
दहा वर्षांनी पुन्हा भेट
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने यशवंतराव चव्हाण जन्मभर स्मारक ताब्यात घेतले. २०१४मध्ये त्याचा भव्य समारंभ झाला होता. त्यावेळी शरद पवार यांनी भेट दिली होती. त्यानंतर दहा वर्षांनंतर पवार यांनी पुन्हा भेट देत जन्मघराची पाहणी केली.