Sangli Municipal Election 2026: महायुतीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर आज विचारमंथन, राष्ट्रवादीशी चर्चा लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:00 IST2025-12-19T17:07:46+5:302025-12-19T18:00:07+5:30
भाजपचा सर्वे अंतिम टप्प्यात; चंद्रकांत पाटील घेणार बैठक : शिंदेसेना, जनसुराज्य, रिपाइंशी चर्चा

Sangli Municipal Election 2026: महायुतीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर आज विचारमंथन, राष्ट्रवादीशी चर्चा लांबणीवर
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची वाढलेली गर्दी, महायुतीतील घटक पक्षांकडून जागांबाबत सुरू असलेली ताणाताणी या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जागा वाटपाबाबतच्या फाॅर्म्युलावर विचारमंथन होणार आहे. त्यासाठी शिंदेसेना, जनसुराज्य शक्ती पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी भाजप नेते चर्चा करणार आहेत.
महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महायुती व महाआघाडीतील पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण करून उमेदवारांची संभाव्य यादी तयार केली आहे. त्यात महायुतीतील घटक पक्षांनी भाजपवर दबाव वाढवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ३० तर शिंदेसेनेने २० आणि रिपाइंने चार ते पाच जागांची मागणी केली आहे. भाजपने जागा वाटपात योग्य सन्मान न राखल्यास स्वतंत्र लढण्याचा इशारा दोन्ही पक्षांकडून दिला जात आहे.
शिंदेसेनेने तर जागा वाटप फिस्कटल्यास महायुतीचेच नुकसान होईल, असे सांगत भाजपला कोंडीत पकडण्याची खेळी खेळली. दुसरीकडे भाजपकडेही इच्छुकांची मोठी फौज आहे. पक्षाकडे ५७० जणांनी उमेदवारी मागितली आहे. एकेका जागेसाठी पाच ते सहा जण इच्छुक आहेत. उमेदवार निश्चित करण्यापूर्वी कोणता पक्ष, किती जागा लढणार, याचा फाॅर्म्युला ठरवला जाणार आहे. त्यानंतर पक्षाची उमेदवारी यादी अंतिम होईल, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता जागा वाटपाच्या फाॅर्म्युल्यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. मंत्री पाटील आधी भाजपच्या कोअर कमिटीशी चर्चा करतील. इच्छुकांच्या मुलाखती, पक्षाकडून निवडणुकीसाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर घटक पक्षांच्या प्रमुखांशी ते संवाद साधणार आहेत. जागा वाटपाच्या चर्चेसाठी शिंदेसेना, जनसुराज्य शक्ती पक्ष आणि रिपाइंच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीशी चर्चा लांबणीवर
जागा वाटपाच्या बैठकीबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटालाही बोलावण्यात आले होते. पण शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मिरजेत माजी महापौरांसह १६ नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने जागा वाटपाच्या बैठकीला हजर राहणार नसल्याचे भाजपच्या नेत्यांना कळवले आहे. पक्षप्रवेशानंतर मिरजेतील राजकीय गणिते बदलणार आहेत. त्यामुळे जास्तीत जागा पदरात पाडून घेण्याची रणनीती राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाने आखली आहे.
भाजपचा सर्वे अंतिम टप्प्यात
भाजपने उमेदवार निश्चितीसाठी प्रभागनिहाय सर्वेक्षण सुरू केले असून, हे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. उमेदवारांची लोकप्रियता, विजयाची शक्यता या निकषांवर सर्वेक्षणाचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू होणार असून, अर्ज भरण्यासाठी पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी कधी जाहीर होणार, याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागले.