खाऊच्या पानांच्या विक्रीवर मंदीचे सावट, मागणीत कमालीची घट; पानउत्पादक शेतकरी अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:49 IST2025-11-28T18:49:31+5:302025-11-28T18:49:41+5:30
खाऊच्या पानांचा विडा रंगेना

खाऊच्या पानांच्या विक्रीवर मंदीचे सावट, मागणीत कमालीची घट; पानउत्पादक शेतकरी अडचणीत
दिलीप कुंभार
नरवाड : महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील हजारोंच्या हाताला काम देणाऱ्या खाऊच्या पानांना बाजारपेठेत कवडीमोलाची किंमत मिळू लागल्याने हा व्यवसाय डबघाईस आला आहे.
सांगली जिल्ह्यातील विशेषतः मिरज तालुक्यातील पुर्व भागात पान उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. २५० हेक्टर पानमळे संपूर्ण महाराष्ट्रात पान खवैयांची पान खाण्याची इच्छा पुरवितात. याशिवाय महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील कर्नाटकातील चिक्कोडी भागातही पानमळे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. मिरज तालुक्यातील नरवाड, बेडग, मालगांव, आरग आदी भागात पानमळ्यांचे क्षेत्र अधिक पहावयास मिळते. यामध्ये नरवाड व बेडग पानमळ्यांचे आगार समजले जाते.
कर्नाटकातील चिन्नूर, बेळूर, लोकूर आदी भागात पानमळ्यांचे अस्तित्व अजूनही टिकून आहे. यासाठी सर्वत्र ''कपूरी'' जातीच्या पानवेलींची पान उत्पादकांनी बियाणे (कलम) साठी निवड केली आहे. मात्र सद्यस्थितीत भारतीय सण समारंभ वगळता इतर वेळी पानांना पान बाजारपेठेत मागणी नसल्याने पानांना कवडीमोलाची किंमत मिळू लागली आहे.
परिणामी पान उत्पादकांपासून वितरकांपर्यंत अर्थकारण बिघडले गेले आहे. याचा सर्वाधिक फटका पान उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पानबाजारात पानांचे दर घसरल्याने कळी, फापडा, हक्कल या पानांच्या विक्रीवर मंदीचे सावट पसरले आहे.
पानांचे सध्याचे दर रुपयांत
पानांची प्रत - यापूर्वीचा दर - आत्ताचा दर
कळी - ५०० ते ३००० - २०० ते १५००
फापडा - ४०० ते २००० - २०० ते ९००
हक्कल - १५० ते २५० - १०० ते २००
पानांचे दर घसरल्याने पान उत्पादकांना शेतमजुरांचा पगार भागविताना पदरमोड करावी लागत आहे. याबाबत बेडगचे पान वखारदार शशिकांत नलवडे म्हणाले, सध्या तरुणाई गुटख्याच्या आहारी गेली आहे. याशिवाय लग्नकार्यातही पूर्वीप्रमाणे पानसुपारी देण्याची पद्धत लोप पावत चालली आहे. पानांना दर केवळ एखाद्या सणापुरता मिळतो - शशिकांत नलवडे, पान वखारदार, बेडग
शासनाने गुटख्यावर बंदी घातली आहे, परंतु त्याची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदत करणे गरजेचे आहे. - मधुकर जाधव, पान उत्पादक शेतकरी.