Sangli- शर्यतीत प्रथम आलेल्या म्हशीचा फोटो व्हॉटस्ॲप स्टेटसला ठेवला, रागातून तरुणावर चाकूहल्ला केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:04 IST2023-04-03T17:03:38+5:302023-04-03T17:04:06+5:30
म्हशीला गुलाल लावल्याचा फोटो कसा ठेवायचा, तुला दाखवतो, असे म्हणत दमदाटी करुन चाकूहल्ला केला

Sangli- शर्यतीत प्रथम आलेल्या म्हशीचा फोटो व्हॉटस्ॲप स्टेटसला ठेवला, रागातून तरुणावर चाकूहल्ला केला
मिरज : म्हशीच्या शर्यतीत प्रथम आलेल्या म्हशीचा गुलाल लावलेला फोटो व्हॉटस्ॲप स्टेटसला ठेवल्याच्या कारणावरून मिरजेत तरुणावर चाकूहल्ला करून डोक्यात काचेची ट्यूब फोडण्यात आली. मंगळवार पेठेत जैन मंदिरजवळ ही घटना घडली.
याप्रकरणी विजय आकाराम खिलारे (वय २२, रा. धनगर गल्ली, मिरज) यांनी शहर पोलिसांत भूषण एडके, विश्वेश गवळी व अन्य दोन अनोळखी तरुण अशा चौघांविरुद्ध तक्रार दिली आहे. दि. २८ मार्च रोजी मिरजेत म्हशीच्या शर्यतीत विजय खिलारे यांच्या म्हशीने प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे खिलारे यांनी म्हशीला गुलाल लावून म्हशीसोबतचा स्वत:चा फोटो त्यांच्या व्हॉटस्ॲप स्टेटसवर ठेवला होता. याचा त्यांचे शर्यतीतील प्रतिस्पर्धी भूषण एडके व विश्वेश गवळी यांना राग आला.
विजय खिलारे हे जैन मंदिराजवळ असलेल्या सागर शिरगुप्पे यांच्या डेअरीत दूध देण्यासाठी गेले असताना भूषण एडके व विश्वेश गवळी याच्यासह त्याचे दोघे साथीदार तेथे आले. यावेळी भूषण याने खिलारे यांना, म्हशीला गुलाल लावल्याचा फोटो कसा ठेवायचा, तुला दाखवतो, असे म्हणत दमदाटी केली. खिलारे यांना खाली पाडून पायावर व मांडीवर चाकूने वार करून जखमी केले. विश्वेश गवळी याने सोबत आणलेली ट्यूबलाइट डोक्यात फोडली. अन्य दोघा साथीदारांनी प्लास्टिक खुर्चीने डोक्यात मारहाण केली.