सांगलीतील खरेदी-विक्रीदारांच्या संमेलनाचा पॅटर्न राज्यात राबविणार, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:45 IST2025-12-26T15:44:48+5:302025-12-26T15:45:07+5:30
शिराळा : सांगली जिल्ह्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी आयोजित केलेला खरेदी विक्री दारांची एकत्रित चर्चा भेट संमेलन या उपक्रमाची शासन स्तरावर ...

सांगलीतील खरेदी-विक्रीदारांच्या संमेलनाचा पॅटर्न राज्यात राबविणार, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचना
शिराळा : सांगली जिल्ह्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी आयोजित केलेला खरेदी विक्री दारांची एकत्रित चर्चा भेट संमेलन या उपक्रमाची शासन स्तरावर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व त्यांना थेट, विश्वासू खरेदीदार मिळावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. संमेलनाचे यश पाहता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी आप-आपल्या जिल्ह्यात “सांगली पॅटर्न”राबविण्याच्या सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात उत्पादित होणा-या कृषि उत्पादने, फळे, प्रक्रीया केलीली कृषि उत्पादने यांना हमखास व स्थिर बाजारपेठ उपलब्ध व्हावी, शेतकरी, व्यापारी व निर्यातदार यांच्यात थेट संवादाची संधी उपलब्ध व्हावी, स्थानिक शेतक-यांना नवीन बाजार पेठांचा लाभ घेता यावा व जिल्ह्यांचा आर्थिकस्तर वाढविण्याकरिता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मित्रा, मुंबई, कृषी विभाग व अपेडा यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथे हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.
सदर संमेलनात विविध प्रक्रीया उद्योजक, व्यापारी, निर्यातदार आणि मार्केटिंग कंपन्यांनी शेतक-यांशी थेट चर्चेव्दारे करार केले. एकुण १४.३९ कोटीचे व्यवहार ठरल्याने सांगली जिल्ह्यातील कृषि क्षेत्राला मोठा आर्थिक लाभ मिळाला. वरील संमेलनाचे यश पाहता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी आप-आपल्या जिल्ह्यात आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांसह कृषी उत्पादनांच्या विपणनासाठी असे संमेलन आयोजित केल्यास राज्यातील कृषिक्षेत्राला व शेतक-यांचे अर्थकारणात सकारात्मक बदल होईल. तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होईल व जिल्ह्यांचा आर्थिकस्तर वाढेल. त्यामुळे असे संमेलन आपल्याकडून कृषी उपजांच्या विपणनासाठी आयोजन करुन त्यांच्या आर्थिक सामाजिक परीणामाच्या विवेचनासह अहवाल पाठवण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
लोकाभिमुख दृष्टिकोन
शेतकरी, खरेदीदार, प्रक्रिया उद्योग व बाजारपेठ यांना एका व्यासपीठावर आणण्याचे यश सांगलीने मिळवले आहे. या उपक्रमामुळे पारदर्शक व्यवहार व परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपक्रमाच्या यशाची दखल घेत मा. मंत्री, पणन यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना “सांगली पॅटर्न” राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.कष्टकरी शेतकरी, संवेदनशील प्रशासन व एकमेकांना सहकार्य करण्याची भावना यांचे हे सामूहिक यश आहे. नवकल्पना व लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे सांगली जिल्ह्याचा आदर्श पुन्हा अधोरेखित झाला.