गुड न्यूज: चांदोली व्याघ्र प्रकल्पात चितळांची संख्या वाढली, आता प्रतीक्षा वाघांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:56 IST2025-01-01T12:56:05+5:302025-01-01T12:56:43+5:30

झोळंबी स्थानांतरण केंद्रात ६० चितळ : प्रजननवाढीसाठी प्रयत्न

The number of chitals increased in Chandoli Tiger Reserve | गुड न्यूज: चांदोली व्याघ्र प्रकल्पात चितळांची संख्या वाढली, आता प्रतीक्षा वाघांची

गुड न्यूज: चांदोली व्याघ्र प्रकल्पात चितळांची संख्या वाढली, आता प्रतीक्षा वाघांची

शिराळा : देशातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात क्षमतेपेक्षा जास्त झालेल्या वाघांचे चांदोलीच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्यात येणार आहे. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ चांदोलीच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा हालचाली सुरू आहेत. चांदोली अभयारण्यातील झोळंबी येथील स्थानांतरण केंद्रात चितळ आणून प्रजनन करून संख्या वाढवण्याचा प्रयत्न चालू असून यास यश येऊन सध्या येथे ५५-६० चितळ आहेत. मात्र अद्याप वाघांना आणण्यास परवानगी मिळालेली नाही.

सध्या काही प्रकल्प क्षेत्रात वाघांची संख्या अत्यल्प असून, काही ठिकाणी अधिक आहे. जास्त संख्या असणाऱ्या क्षेत्रातील वाघ कमी संख्या असणाऱ्या प्रकल्प क्षेत्रात आणून सोडण्यासह वाघांच्या संवर्धनासाठी आवश्यक बाबींवर तीन वर्षांपूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रानंतरच्या बैठकीत विचारविनिमय झाला होता. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. राज्यातील ताडोबा प्रकल्प क्षेत्रात, चंद्रपूर, गडचिरोलीत वाघांची संख्या मोठी आहे. मानवी वस्ती वरील अतिक्रमणामुळे जंगल व मानवी वस्ती यांच्या सीमारेषा अस्पष्ट झाल्या आहेत. 

देशातील अशा जादा संख्येने वाघ असणाऱ्या क्षेत्रातील काही वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यासाठी डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून प्रकल्प क्षेत्राचा गेल्या तीन वर्षांपासून अभ्यास सुरू आहे. त्याचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. अहवाल सादर झाल्यानंतर सह्याद्री प्रकल्पात वाघांच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील मिळणार आहे. राज्य वन्यजीव संवर्धन आराखड्यानुसार वाघांचा अधिवास वाढवण्याचा प्रस्ताव आहे. 

झोळंबी येथिल स्थानांतरण केंद्र येथे एप्रिल २०२२ मध्ये २४ चितळ सोडली होती. त्यांना ८ पिले झाली आहेत. १ एप्रिल २०२३ ला सागरेश्वर येथून दोन नर आणि दोन मादी चितळ आणली होती. चितळ हे वाघाचे मुख्य खाद्य आहे. चांदोली जंगलात वाघ आणायचा तर त्याला चितळांची संख्या पुरेशी असणे गरजेचे आहे. म्हणून शासनाने सागरेश्वर, कात्रज आणि सोलापूर येथून चितळ आणून चांदोली जंगलात सोडण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी आठ हेक्टर क्षेत्राला कुंपण करून त्यात यांना सोडून त्याचे प्रजनन करून संख्या वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे, याला यश ही येत आहे.

चितळांची पैदास समाधानकारक

झोळंबी येथील केंद्रात सध्या ५५-६० चितळ आहेत. त्यांना योग्य पोषक आहार देण्यात येत आहे. पावसाळ्यात सरकी पेंड आदी तर उन्हाळ्यात मका, बाजरी, हत्ती गवत आदी खाद्य दिले जाते. त्यांची पैदास ही समाधानकारक आहे. - किरण माने, वनक्षेत्रपाल, चांदोली

Web Title: The number of chitals increased in Chandoli Tiger Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.