सांगली जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी अर्ज दाखलचे प्रमाण वाढले, कुठे किती अर्ज आले.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 19:22 IST2025-11-14T19:21:52+5:302025-11-14T19:22:01+5:30
Local Body Election: ईश्वरपूरमध्ये महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वनाथ रामचंद्र डांगे शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल करणार

सांगली जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी अर्ज दाखलचे प्रमाण वाढले, कुठे किती अर्ज आले.. वाचा
आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीसाठी चौथ्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी हरीश धनाजी खिलारी आणि आप्पासाहेब नानासाहेब माळी यांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर नगरसेवक पदासाठी चार प्रभागांतून एकूण सात अर्ज दाखल झाले आहेत.
नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक ७ मधून शहाजी यशवंत जाधव (शिवसेना) आणि पोपट मारुती पाटील (तीर्थक्षेत्र विकास आघाडी) यांनी अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक १२ मधून विनय जयराम पतकी (शिवसेना) यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्रमांक १३ मधून गणेश प्रभाकर माने (अपक्ष) यांनी नामनिर्देशन दाखल केले. तर प्रभाग क्रमांक १५ मधून अर्चना मनोज नांगरे (शिवसेना) आणि समाबाई भीमराव काळे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी) यांनी अर्ज दाखल केले आहेत.
ईश्वरपूरच्या पालिका निवडणुकीसाठी एक अर्ज दाखल
ईश्वरपूर : उरूण ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी प्रभाग क्रमांक ६ मधील सर्वसाधारण खुल्या जागेसाठी जयवंत शामराव जाधव या उमेदवाराने आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्यानंतर चौथ्या दिवशी एकमेव अर्ज दाखल झाला. दरम्यान, राष्ट्रवादी विरोधी महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वनाथ रामचंद्र डांगे हे शुक्रवारी सकाळी महायुतीमधील जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी बसस्थानकापासून नगरपरिषदेपर्यंत रॅली काढली जाणार आहे.
आष्टा येथे नगराध्यक्ष पदासह सहा उमेदवारी अर्ज दाखल
आष्टा : आष्टा नगरपरिषद निवडणुकीसाठी गुरुवारी नगराध्यक्ष पदासह सहा अर्ज दाखल करण्यात आले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी दिली.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल पडळकर तसेच लता अमोल पडळकर, तेजश्री अभिजीत बिरनाळे, राहुल राजकुमार थोटे ,स्वप्ना अनुप वाडेकर, अलका सुरेश वारे, प्रमोद वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आष्टा नगरपरिषद निवडणुकीसाठी शहरातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. निवडणुकीबाबत योग्य ती माहिती घेऊन निवडणूक कक्षात तपासणी केल्यानंतर, चलन भरल्यानंतरच अर्ज दाखल करण्याचे आवाहन राजेश शेखर लिंबारे यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार राजेश राजपूत, मुख्याधिकारी अवधूत कुंभार, प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते, नरेंद्र घाटगे, सुदर्शन वाडकरसह पदाधिकारी उपस्थित होते.
विटा नगरपरिषदेसाठी गुरुवारअखेर नऊ उमेदवारी अर्ज दाखल
विटा : विटा नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या गुरुवारी चौथ्या दिवशी भारतीय जनता पक्षातून तीन तर शिवसेना पक्षातून २ असे ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे गुरुवार अखेर विटा पालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
मंगळवारी शिवसेनेतून भालचंद्र कांबळे व लीला भिंगारदेवे यांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी भारतीय जनता पार्टीतून मालती विश्वनाथ कांबळे व उमा तानाजी जाधव या दोन महिला उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी विटा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी भाजपचे प्रशांत विश्वनाथ कांबळे, सुवर्ण संदीप शितोळे, मयुरेश विवेक गुळवणी तर शिवसेनेतून रणजीत अरविंद पाटील व रूपाली सुबराव कांबळे या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे गुरुवार अखेर विटा पालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या नऊ झाली आहे.
दरम्यान, विटा नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार, दि. १० पासून सुरू झाली असताना गेल्या चार दिवसापासून नगराध्यक्ष पदासाठी एकही उमेदवार अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे भाजप व शिवसेना पक्षात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिराळा नगरपंचायतसाठी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल
शिराळा : शिराळा नगरपंचायत निवडणुकीसाठी आज गुरुवारी चौथ्या दिवशी दोन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी शामला खोत पाटील यांनी सांगितले की, प्रभाग २ साठी स्नेहल खबाले, अमित भोसले प्रभाग ४ साठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
जत नगरपरिषदेसाठी चार अर्ज दाखल
जत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी चांगलाच रंग चढला आहे. चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हर्षवर्धन कांबळे, विक्रम ताड, प्रमोद डोळळी आणि अमीर नदाफ यांनी उमेदवारी नोंदवली आहे. नगराध्यक्षपदासाठी आतापर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ चार दिवस शिल्लक आहेत. परंतु, त्यापैकी रविवारी सुट्टी असल्यामुळे फक्त तीन दिवस अर्ज दाखलसाठी राहणार आहेत.