शक्तिपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यात १५२ हेक्टरची मोजणी पूर्ण, भरपाईचे दोन प्रकारही निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:07 IST2025-07-24T12:06:52+5:302025-07-24T12:07:23+5:30

शेटफळे, सावळज, सावर्डेतील १०० टक्के मोजणी : 

The measurement of 152 hectares in Sangli district for the Shaktipeeth highway has been completed, two types of compensation have also been decided. | शक्तिपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यात १५२ हेक्टरची मोजणी पूर्ण, भरपाईचे दोन प्रकारही निश्चित

शक्तिपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यात १५२ हेक्टरची मोजणी पूर्ण, भरपाईचे दोन प्रकारही निश्चित

अशोक डोंबाळे

सांगली : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीविरोधात संघटना आणि स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच जिल्हा प्रशासनाने मोजणीचा मोठा टप्पा पूर्ण केला आहे. आटपाडी तालुक्यातील शेटफळे तसेच तासगाव तालुक्यातील सावळज, सावर्डे या तीन गावांतील १०० टक्के जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील ७५ गटांतील १५२ हेक्टर जमिनीची मोजणी शेतकऱ्यांच्या सहमतीने पार पडली आहे.

जिल्ह्यातील १८ गावांतील जमिनीच्या एक हजार ३४० गटांमधून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. या गटातील ७७६ हेक्टर क्षेत्र अधिगृहीत केले जाणार आहे. यापैकी आटपाडी तालुक्यातील शेटफळ, तासगाव तालुक्यातील सावळज, सावर्डे या तीन गावातील १०० टक्के जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे.

उर्वरित तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी ४ गट, नागाव कवठे ४१ गट, कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे २३ गट आणि तिसंगी गटातील एका गट, असे एकूण ७५ गटांतील १५२ हेक्टर जमिनीची मोजणी शेतकऱ्यांच्या सहमतीने पूर्ण झाली आहे. अजूनही एक हजार २६५ गटांतील ६२४ हेक्टर क्षेत्रातील मोजणीचे काम प्रशासनाकडून सुरू आहे, अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.

..अशी मिळणार भरपाई

शक्तिपीठ महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना दोन प्रकारची मदत दिली जाणार आहे. सहमतीने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना तीन वर्षांतील खरेदी आणि रेडिरेकनर यापैकी जी सर्वाधिक रक्कम असेल त्याच्या पाचपट भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. दुसरी मदत ज्या शेतकऱ्यांनी सहमतीने जमीन दिली नाही, तेथील शेतकऱ्यांना चारपट भरपाई दिली जाणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.

शुक्रवारी संभाजीनगरला कार्यशाळा

शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनी आणि शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी शुक्रवारी ( दि. २५) संभाजीनगर येथे कार्यशाळा शासनातर्फे होणार आहे. या कार्यशाळेला शक्तिपीठ महामार्ग ज्या जिल्ह्यातून जाणार आहे, तेथील जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, भूसंपादन अधिकारी जाणार आहेत. या कार्यशाळेत शक्तिपीठ महामार्गाची दिशा निश्चित होणार आहे.

शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांनी सहमतीने जमिनी दिल्या आहेत. ७५ गटांतील १५२ हेक्टरची मोजणी पूर्ण झाली आहे. शेटफळे, सावळज, सावर्डेतील मोजणी १०० टक्के पूर्ण झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद असून, लवकरच ते शेतकरीही मोजणीस सहमती देतील. -उत्तम दिघे, प्रांताधिकारी, मिरज

Web Title: The measurement of 152 hectares in Sangli district for the Shaktipeeth highway has been completed, two types of compensation have also been decided.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.