रांजणीचा ड्रायपोर्ट म्हणजे बोलघेवड्या नेत्यांचा भुलभुलैया; गडकरी बोलले, जयंतराव फुलले, आता खासदारही पेटले!

By संतोष भिसे | Published: January 31, 2023 05:57 PM2023-01-31T17:57:07+5:302023-01-31T17:58:00+5:30

संतोष भिसे सांगली : सांगलीच्या विकासाचा माइलस्टोन ठरणाऱ्या रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील ड्रायपोर्टचा भूलभुलैया नेतेमंडळींनी सुरूच ठेवला आहे. २०१८ ...

The maze of Dryport at Ranjani in Sangli district continues with the leaders, Promises from Nitin Gadkari, Jayant Patil, Sanjay Patil | रांजणीचा ड्रायपोर्ट म्हणजे बोलघेवड्या नेत्यांचा भुलभुलैया; गडकरी बोलले, जयंतराव फुलले, आता खासदारही पेटले!

रांजणीचा ड्रायपोर्ट म्हणजे बोलघेवड्या नेत्यांचा भुलभुलैया; गडकरी बोलले, जयंतराव फुलले, आता खासदारही पेटले!

googlenewsNext

संतोष भिसे

सांगली : सांगलीच्या विकासाचा माइलस्टोन ठरणाऱ्या रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील ड्रायपोर्टचा भूलभुलैया नेतेमंडळींनी सुरूच ठेवला आहे. २०१८ पासून केंद्रापासून राज्यापर्यंतचे नेते जनतेचे स्वप्नरंजन करत आहेत, पण आजतागायत साधी कुदळही पडलेली नाही. साराच मामला ‘ड्राय’ आहे.

ड्रायपोर्टची जबाबदारी डोक्यावर घेऊन मिरविणाऱ्या संजय पाटील यांनी, तर दुसरी खासदारकीही ड्रायपोर्टमध्येच संपवत आणली आहे. ते ‘ड्रायपोर्ट होणार, होणार’ म्हणत राहिले आणि हातकणंगलेच्या खासदारांनी तिकडे मंजूर करून घेतलेदेखील. तेदेखील चोरीछुपे नव्हे, तर चक्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या तोंडातून जाहीररीत्या वदवले. गडकरींनीही इतकी जोरदार बॅटिंग केली की, अवघ्या आठच महिन्यांपूर्वी सांगलीच्या ड्रायपोर्टची ब्लू प्रिंट सांगलीत येऊन आपणच सादर केल्याचा विसर पडला असावा. विसर पडला नाही म्हणावे, तर ६०-७० किलोमीटरमध्ये दोन-दोन ड्रायपोर्ट होणार कसे, याचे गणित सोडवायला विसरले असावेत.

२०१८ पासून पाच वर्षे स्वप्ने रंगविण्यातच संपली. रांजणी येथील मेष पैदास केंद्रावर कोट्यवधींच्या उलाढालीची स्वप्ने दुष्काळी शेतकऱ्यांनी पाहिली. द्राक्ष, डाळिंब, बेदाण्याचे कंटेनरच्या कंटेनर अमेरिका, इंग्लंड आणि चीनला जातानाचे स्वप्न पाहिले; पण गडकरींनी हातकणंगलेची जागा जाहीर करताच शेतकरी खाडकन जागे झाले. तत्पर खासदार संजय पाटील यांनी खुलासा करून रांजणीमध्येच ड्रायपोर्ट होणार असल्याचे ठासून सांगत पुन्हा भुलीचा डोस पाजला.

काय आहे स्थिती?

ड्रायपोर्टच्या भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे. मेष पैदास केंद्राच्या २२५० एकर जमिनीपैकी लोहमार्गाच्या बाजूकडील २५० एकर व अन्य सुमारे ४० एकर अशा २९० एकर जागेचे भूसंपादन झाले आहे. जागा एमआयडीसीकडे वर्गही झाली आहे. लोहमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, नदी, विद्युतगृह आदी सोयी असल्याने ती ड्रायपोर्टसाठी योग्य जागा आहे. नेहरू पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी पाहणीही केली. मात्र, त्यानंतर घोडे अडले.

जयंतरावांनी काय केले?

तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी एप्रिल २०२२ मध्ये बैठकीत ड्रायपोर्टची व्यवहार्यता तपासण्याचे आदेश दिले होते. एमआयडीसी व नेहरू पोर्टने एकत्रित पाहणीची सूचना केली. एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी रंगा नाईक यांनी सादरीकरणही केले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अदिती तटकरे यांनीही तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले होते. गडकरी यांच्याकडे मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्कसाठी पाठपुराव्याची सूचना केली होती.

गडकरींचे विमान अद्याप हवेतच

गडकरी यांनी तर सॅटेलाइट ड्रायपोर्टचे स्वप्न दाखविले. कंटेनर्स थेट परदेशी बाजारपेठेत पाठविण्याची योजना सांगितली. जालना, वर्धा, नाशिकमध्ये झाले, सांगलीचेही लवकरच होईल असे गाजर दाखविले. साडेतीन किलोमीटरचा सिमेंटचा रस्ता असा बांधू की, त्यावर कोणतेही मोठे विमान उतरू शकेल असा भव्य चित्रपट शेतकऱ्यांसमोर सादर केला. जागा द्या, एअरपोर्ट लॉजिस्टिक पार्क, प्री कुलिंग प्लँट, कोल्ड स्टोअरेज उभे करू, असे सांगितले; पण त्यांचे विमान ड्रायपोर्टवर काही अद्याप उतरले नाही.

बोलघेवडे नेते

  • ड्रायपोर्टच्या रस्त्यांवर मोठे विमानही उतरेल - नितीन गडकरी
  • ड्रायपोर्ट हातकणंगलेत नाही, सांगलीतच होणार - खासदार संजय पाटील
  • रांजणी येथे ड्रायपोर्टसाठी व्यवहार्यता तपासावी - तत्कालीन मंत्री जयंत पाटील

Web Title: The maze of Dryport at Ranjani in Sangli district continues with the leaders, Promises from Nitin Gadkari, Jayant Patil, Sanjay Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.