लग्नातील ‘जाणवस’ घर ग्रामीण भागातून हद्दपार, खेड्यापाड्यातही कार्यालयामधील लग्नाची क्रेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:40 IST2025-04-07T19:40:28+5:302025-04-07T19:40:53+5:30
बाबासाहेब परीट बिळाशी : ‘जानवसा घर’ हा शब्द ग्रामीण भागात प्रचलित होता. पूर्वी गावगाड्यातील लग्नांमध्ये जानवस घर हे नवरी ...

लग्नातील ‘जाणवस’ घर ग्रामीण भागातून हद्दपार, खेड्यापाड्यातही कार्यालयामधील लग्नाची क्रेज
बाबासाहेब परीट
बिळाशी : ‘जानवसा घर’ हा शब्द ग्रामीण भागात प्रचलित होता. पूर्वी गावगाड्यातील लग्नांमध्ये जानवस घर हे नवरी मुलगी उतरण्याचे हक्काचे आणि महत्त्वाचे ठिकाण होते. आधुनिकीकरणाच्या रेट्यामध्ये कार्यालयातील लग्नांमुळे जानवस घर हा शब्द आणि घरही हद्दपार होत आहे.
ग्रामीण भागात पूर्वी पाच दिवसाची लग्न होत असत. ती नंतरच्या काळामध्ये तीन दिवसांवर आली. नवरी मुलगी आणि वऱ्हाड आदल्या दिवशी लग्नाच्या ठिकाणी मुक्कामाला येत असे. नवरी मुलगी आणण्यासाठी बैलगाड्या सजवल्या जात होत्या. जुन्या घातलेल्या बैल आणि सजवलेल्या बैलगाड्यातून आलेल्या नवरी मुलगीचे स्वागत जंगी होत असे. गावातील वेशीवर पै-पाहुण्यांच्या भेटीगाठी होत असत. त्यानंतर नवरी मुलगीला जानवस घरी घेऊन जात असत.
जानवस घरी मुलगीला तयार होण्यासाठी सुरक्षित जागा होती. तिथे त्यांच्या राहण्याची जेवणाची व तयार होण्याची गडबड चाले. वरमाई जानवस घराची मुख्य असायची. तिच्या ताब्यात त्या दिवशीचे किमती दस्तऐवज, आहेर याबाबतची सगळी जबाबदारी असे. अलीकडे यादी पे शादी पद्धतीने तातडीने लग्न ठरत आहेत व भावकी लग्नात कुरघड्या करतील, यामुळे बहुतांशी विवाह कार्य जवळच्या कार्यालयातच होत आहेत.
कार्यालयातच वधू पक्ष - वर पक्ष यांच्या खोल्या असल्यामुळे जानवस घर हा शब्द आणि घरही प्रचलित परंपरेतून हद्दपार होत आहे. कितीही आधुनिकरणाचा रेटा आला तरी आजही ग्रामीण भागात एखाद्या व्यक्तीचा ठावठिकाणा शोधायचा असेल तरीही लोक सांगतात आमक्या तमक्याचे ते जानवस घर आहे.
कालानुरूप बदल
जुना पिढीतील अण्णा परीट म्हणाले, पूर्वी लग्नसोहळा थाटामाटात असायचा. लग्नामध्ये सर्व भावकी एका जिवाने असायची, सर्वजण झटायचे. परंतु कालानुरूप त्यामध्ये बदल झाले, सध्या लोकांना वेळ कमी आहे आणि लोकांकडे आर्थिक ताकद आल्यामुळे हे बदल होत राहतील. परंतु जानवस घर हा शब्द मात्र कायमस्वरूपी जुन्या पिढीच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे.