सांगलीत थंडीची लाट.. पारा १३ अंशाखाली; रस्त्यांवर शेकोट्या पेटल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:44 IST2025-12-11T18:44:37+5:302025-12-11T18:44:37+5:30
थंडीची लाट पुढील आठवडाभर राहण्याची शक्यता

सांगलीत थंडीची लाट.. पारा १३ अंशाखाली; रस्त्यांवर शेकोट्या पेटल्या
सांगली : जिल्ह्यात थंडीचा जोर वाढून तापमान १० ते ९ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी जाणवत आहे. उत्तरेकडे थंडीची लाट असून, तेथून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यासह जिल्हा सुद्धा गारठला आहे. वाढलेल्या थंडीमुळे पहाटे व रस्त्यांवर शेकोट्या पेटू लागल्या आहेत. अनेक लोक स्वेटर, कानटोपी, हातमोजे अशा लवाजम्यासह बाहेर पडताना दिसत आहेत. ही थंडीची लाट पुढील आठवडाभर राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली.
उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडल्याने त्याचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवत आहेत. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडी सक्रिय झाली आहे. हवामान विभागाने राज्यात १० व ११ डिसेंबरला यलो अलर्ट दिला आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात सरासरी तापमान किमान तापमान ९ ते १२ अंशांपर्यंत राहणार आहे. या शीतलाटेमुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
तापमानातील बदल, थंडीचा कडाका आणि हवेतील प्रदूषण यामुळे ताप, सर्दी, खोकला व घशातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. थंडीमुळे पहाटे व सकाळी धुके पसरत आहे. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. सकाळी विद्यार्थ्यांना कुडकुडत शाळा गाठावी लागत आहे. रस्त्यावर उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.
गत व पुढील आठवड्यातील तापमान
दिनांक / किमान / कमाल
११ डिसेंबर / ९ / ३१
१२ डिसेंबर / १० / ३०
१३ डिसेंबर /१२ / ३०
१४ डिसेंबर /१३ / ३१
१५ डिसेंबर / १३ / ३१