नागाशी खेळ करुन तरुण फसला, व्हायरल व्हिडिओतून वन विभागाने पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 11:43 IST2022-03-29T13:17:49+5:302022-03-30T11:43:36+5:30
नागाचा फणा फार काही करु शकला नाही, मात्र वन विभागाने कायद्याचा दंश केल्याने त्याला फटका बसला.

नागाशी खेळ करुन तरुण फसला, व्हायरल व्हिडिओतून वन विभागाने पकडला
सांगली : नाग पकडून त्या नागाशी खेळ करणं सांगली जिल्ह्यातील तरुणाला चांगलचं महागात पडलं आहे. नागाच्या तोंडाला तोंड लावलेल व्हिडिओ संबंधित तरुणाने सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्हिडिओना हजारो लाईक्स् तर मिळाले, मात्र वनविभागाच्या अनलाईकने या तरुणाचा सर्वच खेळ बिघडला.
मौजे बावची ( ता. वाळवा जि.सांगली) येथील प्रदीप अशोक अडसुळे (वय-२२) असे या तरुणाचे नाव आहे. प्रदीपने नाग पकडून त्याच्या सोबत केलेल्या धाडसी खेळाचा व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओत तो नागाच्या तोंडाला तोंड लावत होता. हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर त्याला हजारो लाईक्स् मिळाले, मात्र वनविभागाच्या त्याचा खेळ बिघडवत त्याला ताब्यात घेतलं.
नागाचा फणा फार काही करु शकला नाही, मात्र वन विभागाने कायद्याचा दंश केल्याने त्याला फटका बसला. त्याच्यावर वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई उपवनसंरक्षक विजय माने सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सचिन जाधव, सुरेश चरापले, अमोल साठे वनरक्षक बावची, निवास उगले व भगवान गायकवाड यांच्या पथकाने मंगळवारी केली.