शेडबाळ मठाचा हत्ती सांगली वन विभागाने घेतला ताब्यात, माहुतावर गुन्हा दाखल 

By संतोष भिसे | Published: April 22, 2024 04:27 PM2024-04-22T16:27:33+5:302024-04-22T16:28:01+5:30

नांद्रे (ता. मिरज) येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी आणला होता हत्ती 

The elephant of Shedbal Math was taken into custody by the Sangli Forest Department, a case was registered against the mahout | शेडबाळ मठाचा हत्ती सांगली वन विभागाने घेतला ताब्यात, माहुतावर गुन्हा दाखल 

शेडबाळ मठाचा हत्ती सांगली वन विभागाने घेतला ताब्यात, माहुतावर गुन्हा दाखल 

सांगली : नांद्रे (ता. मिरज) येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी हत्ती आणला होता. तो वन विभागाने ताब्यात घेतला असून वन अधिनियमानुसार माहुतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हत्तीच्या वाहतुकीसाठी परवाना नसणे यासह विविध गुन्हे दाखल केल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. शेडबाळ (ता. कागवाड) येथील एका मठाच्या मालकीचा हा हत्ती नांद्रे येथील धार्मिक कार्यक्रमासाठी ट्रकमधून आणला होता. कार्यक्रमातील मिरवणुकीत दिवसभर तो सहभागी झाला. त्याच्या पाठीवरील अंबारीत काही भाविकही बसले होते. 

हत्तीच्या वापराबाबत व वाहतुकीविषयी कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन झाल्याची तक्रार मिरजेतील एका प्राणीमित्राने वन विभागाकडे केली. त्यानंतर वन विभागाच्या भरारी पथकाने हत्ती ताब्यात घेण्याची कार्यवाही केली. सांगलीत वसंतदादा साखर कारखाना परिसरात ट्रकमधून नेताना रविवारी सायंकाळी त्याला ताब्यात घेतले. कुपवाडमध्ये वन कार्यालयात रात्रभर ठेवले. सोमवारी सकाळी तालुका पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद ढगे यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली.

हत्तीच्या सोंडेत बालक

नांद्रे येथे धार्मिक कार्यक्रमादरम्यान मिरवणुकीत सहभागी झालेल्या हत्तीच्या सोंडेत भाविकांनी एका बालकाला दिले. हत्तीने त्याला सोंडेत धरुन उंचावले आणि पुन्हा पालकांच्या ताब्यात दिले. यादरम्यान, घाबरलेल्या बालकाने रडून आकांत मांडल्याचे पहायला मिळाले.

शेडबाळच्या हत्तीला डिमांड

विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी, उदगाव, कुंथुगिरी येथून सांगली जिल्ह्यात हत्ती आणले जायचे. गेल्या काही वर्षांत त्यांनी सांगली जिल्ह्यात हत्ती पाठविणे थांबविले आहे, त्यामुळे शेडबाळच्या हत्तीला भलतीच मागणी आहे. त्यासाठी अनेकदा कायदेशीर तरतुदींचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नांद्रे येथील कार्यक्रमाला आणलेला हत्ती आम्ही ताब्यात घेतला आहे. वाहतुकीसाठी योग्य परवाना नसल्याने वन अधिनियमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशांनुसार पुढील कार्यवाही केली जाईल. - महंतेश बगले, वन परिक्षेत्र अधिकारी (भरारी पथक)

Web Title: The elephant of Shedbal Math was taken into custody by the Sangli Forest Department, a case was registered against the mahout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.