सांगली जिल्ह्यातील ४२९ लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न अपूर्णच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:25 IST2025-05-08T18:25:19+5:302025-05-08T18:25:34+5:30
बेघरांना कोणी जागा देणार का! : प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचा लाभार्थ्यांचा आरोप

सांगली जिल्ह्यातील ४२९ लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न अपूर्णच
सांगली : जिल्ह्यातील बेघरांना घर बांधकामासाठी स्वत:ची जागा नसल्यास शासनाकडून अनुदान दिले जाते. दरम्यान, घर बांधण्याकरिता जागा नसलेल्यांच्या सर्व्हेनुसार ४२९ लाभार्थ्यांना जागेची गरज आहे. मात्र, शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही लाभार्थ्यांना जागा मिळत नसल्यामुळे त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. स्वत:च्या मालकीची जागा नसलेल्या लाभार्थ्यांना स्वप्नातील घराची प्रतीक्षाच असल्याचे चित्र पाहायला मिळते.
जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून घरकुल दिले जात आहेत. ज्या लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी स्वत:ची जागाच नाही, अशांना जागा खरेदीसाठी अनुदान दिले जाते. स्वत:ची जागा नसल्याने उन्हाळा असो की हिवाळा- पावसाळा, उर्वरित लाभार्थ्यांना उघड्यावर अथवा कच्च्या, छपराच्या घरातच राहावे लागत असल्याचे चित्र आहे.
शासनाकडे वारंवार जागा मिळावी, यासाठी लाभार्थी फेऱ्या मारत असूनही त्यांना प्रशासनाकडून जागा उपलब्ध होत नाही. म्हणून लाभार्थी नाराज आहेत. काही लाभार्थ्यांनी राज्य शासनाकडे तक्रार करण्याचा शेवटचा मार्ग स्वीकारला आहे, असे लाभार्थी सुरेश कांबळे यांनी सांगितले.
शासकीय जागा उपलब्ध असूनही मिळत नाही
प्रधानमंत्री आवास योजना, शबरी, इंदिरा आवास अशा योजनांच्या माध्यमातून घरकुल बांधकामासाठी जागा नाही म्हणून घरकुल मंजूर असूनही लाभार्थ्यांना बांधता येत नाही. जागा महाग असल्याने हे अनुदान कमी पडते आणि त्यामुळे लाभार्थ्यांनी या अनुदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. तसेच शासकीय जागा उपलब्ध असतानाही प्रशासनाकडून ते वेळेत मिळत नसल्यामुळेही लाभार्थी नाराज आहेत.
घरकुलासाठी जागा नसलेले लाभार्थी संख्या
तालुका - लाभार्थी संख्या
- आटपाडी - ३
- जत - ८५
- कडेगाव - ६६
- कवठेमहांकाळ - १८
- खानापूर - ७२
- मिरज - ५४
- पलूस - १८
- तासगाव - ९४
- शिराळा - ८
- वाळवा - ११