शिक्षण क्षेत्रासमोरील संकट भयावह, पी. साईनाथ यांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 13:33 IST2024-12-23T13:31:29+5:302024-12-23T13:33:39+5:30

नवे शिक्षण धोरण गरिबांना शैक्षणिक प्रवाहापासून दूर नेणारे

The crisis facing the education sector is frightening says P. Sainath | शिक्षण क्षेत्रासमोरील संकट भयावह, पी. साईनाथ यांनी व्यक्त केले मत

शिक्षण क्षेत्रासमोरील संकट भयावह, पी. साईनाथ यांनी व्यक्त केले मत

सांगली : महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील शाळा बंद केल्या जात असून अन्य शाळा, अंगणवाड्या, पोषण आहाराचे खासगीकरणही केले जात आहे. शिक्षण क्षेत्रासमोर यातून मोठे संकट उभे राहिले आहे. नवे शिक्षण धोरण गरिबांना शैक्षणिक प्रवाहापासून दूर नेणारे आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी व्यक्त केले.

सांगलीच्या शांतिनिकेतन लोकविद्यापीठात रविवारी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांच्या पंचाहत्तरीनिमित्त कार्यगौरव समारंभ पार पडला. काठी, घोंगडे, पुष्पहार, मानपत्र देऊन त्यांचा सपत्निक गौरव करण्यात आला. ॲड. तेजस्विनी सूर्यवंशी, विद्या स्वामी यांच्या हस्ते प्रमिला गुरव यांना साडी, चोळी, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी साईनाथ यांच्यासह ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, आमदार अरुण लाड, डॉ. भारत पाटणकर, हुतात्मा संकुलाचे प्रमुख वैभव नायकवडी आदी उपस्थित होते.

साईनाथ म्हणाले की, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील एकूण १५ हजार शाळांपैकी १४ हजार ७८३ शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे २ लाखांवर गरीब मुले शिक्षणापासून दूर केली जातील. नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत तोट्याच्या शाळा म्हणून त्यांना कुलूप लावले जाणार आहे. अन्य सरकारी शाळा, अंगणवाड्या, त्याठिकाणचा पोषण आहार यांचे खासगीकरण केले जाईल. शेतीशाळाही संपुष्टात आणल्या जात आहेत. प्राचीन ६४ कला व व्यवसाय प्रकारांचा नव्या शैक्षणिक धोरणात समावेश केला गेला. त्यात चौर्यकर्म, कोंबड्यांची झुंजही समाविष्ट आहे. त्याचेही शिक्षण सरकार देणार आहे का?

संजय आवटे म्हणाले की, चळवळीतील जुन्या पिढीने नव्या पिढीची भाषा शिकून त्यांच्या मेंदूत प्रस्थापितांकडून केली जाणारी गडबड रोखली पाहिजे. त्यासाठी पुरोगामी सांस्कृतिक चळवळी विकसित झाल्या पाहिजेत. उद्याच्या पिढीपर्यंत भारताची सत्यगाथा पोहोचविण्याची जबाबदारी चळवळीतील कार्यकर्ते, संघटनांवर आहे. प्रा. डॉ. बाबूराव गुरव, डॉ. भारत पाटणकर यांच्यासारखे नेते या चळवळीला लाभले असल्याने राजकीय, सामाजिक भविष्य आश्वासक वाटते.

यावेळी संपतराव पवार, ॲड. अजित सूर्यवंशी, ॲड. सुभाष पाटील, व्ही. वाय. पाटील, विकास मगदूम आदी उपस्थित होते. अरुण लाड यांनी स्वागत, कॉ. धनाजी गुरव यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण शिंदे, सारिका माळी यांनी सूत्रसंचालन केले.

चळवळ शेवटच्या श्वासापर्यंत

सत्काराला उत्तर देताना बाबूराव गुरव म्हणाले, हा सत्कार संस्मरणीय तसेच पुढील वाटचालीसाठी बळ देणारा आहे. भविष्यात अधिक जाेमाने चळवळीत काम करू. नव्या पिढीत चांगल्या विचारांची पेरणी करण्याचे काम शेवटच्या श्वासापर्यंत करू.

..तर ४० वर्षांपर्यंत योजना चालतील

साईनाथ म्हणाले, भारतात १९९१ मध्ये एकही डॉलर अरबपती नव्हता. आता अशा अरबपतींची संख्या २१७ इतकी झाली असून देशाच्या जीडीपीचा एकतृतीयांश हिस्सा आता त्यांच्याकडे आहे. त्यांच्या वेल्थ टॅक्स म्हणजे श्रीमंतीवर २ टक्के कर लावला तरी रोहयो पुढील ४० वर्षे, मध्यान्ह भोजन योजना २५ वर्षे विनासायास चालेल. ५ टक्के कर घेतला तर देशातील संपूर्ण सार्वजनिक आरोग्य यंत्रणा नव्याने सक्षमपणे उभी राहील.

Web Title: The crisis facing the education sector is frightening says P. Sainath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.