सांगलीतील दिग्गज नेत्यांची पोकळी भरून काढण्याचे युवा नेत्यांपुढे आव्हान

By हणमंत पाटील | Published: February 7, 2024 05:04 PM2024-02-07T17:04:36+5:302024-02-07T17:05:07+5:30

हणमंत पाटील सांगली : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून पुर्वीचा सातारा जिल्हा म्हणजे आताचे सांगली हे क्रांतिकारकांचे महत्त्वाचे केंद्र होते. भारताला ...

The challenge to young leaders is to fill the void of veteran leaders in Sangli | सांगलीतील दिग्गज नेत्यांची पोकळी भरून काढण्याचे युवा नेत्यांपुढे आव्हान

सांगलीतील दिग्गज नेत्यांची पोकळी भरून काढण्याचे युवा नेत्यांपुढे आव्हान

हणमंत पाटील

सांगली : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून पुर्वीचा सातारा जिल्हा म्हणजे आताचे सांगली हे क्रांतिकारकांचे महत्त्वाचे केंद्र होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकारच्या माध्यमातून शिराळ्यातील बिलाशी गाव स्वतंत्र होते. याच स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीमुळे या भागातील भूमिपूत्र यशवंतराव चव्हाण स्वतंत्र महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिले मुख्यमंत्री झाले. पुढे केंद्रात जाऊन त्यांनी संरक्षणमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून यशस्वी राजकीय कारकिर्द केली.

सांगली जिल्ह्याच्या याच मातीतून राजकीय वारसा घेऊन माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व सहकार महर्षी राजारामबापू पाटील यांनी आपले आयुष्य समर्पित केले. हाच राजकीय वारसा पुढे शिराळा तालुक्यातील कोकरुडचे शिवाजीराव देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्य ते विधान परिषदेच्या सभापतीपदाची हॅट्रिक केली. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री म्हणून नक्षलवादी गडचिरोली जिल्हा दत्तक घेऊन, तसेच ग्रामविकासमंत्री झाल्यानंतर स्वच्छ्ता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सांगलीची छाप कायम ठेवली. त्यावेळी आर. आर. आबा यांच्या सांगलीचे आम्ही हे सांगताना प्रत्येक सांगलीकराचा उर भरून येत होता.

पुढे वसंतदादा यांचे नातू मंत्री मदन पाटील यांनीही कार्यकर्त्यांचे संघटन करून राज्याच्या राजकारणावर सांगलीचा दबदबा कायम ठेवला होता. मात्र, आर. आर. आबा आणि मदन भाऊ या दोन्ही नेत्यांचे २०१५ साली आकली निधनाने जिल्ह्याची कधीही भरून न येणारी हानी झाली.

आबा आणि भाऊंच्या जाण्याने सावरणाऱ्या सांगलीला आणखी एक झटका बसला २०१८ साली. दिलदार व उमद्या मनाचे नेते डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जाण्याने. साहेब कधीही मतदार संघापुरता विचार करणारे नेते नव्हते. त्यांनी भिलवडी, वांगी, कडेगांव, कडेपूर व पलूस परिसराचा कायापालट केलाच. पण त्याही पलिकडे जाऊन त्यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून पुणे, मुंबई, दिल्ली ते परदेशात सांगलीकराना संधी मिळवून दिली. आबा आणि साहेब यांनी रात्रीचा दिवस करून राजकारणातील मंत्रीपदाच्या माध्यमातून सांगलीला समृध्द करण्यासाठी मोठे योगदान दिले. समर्पित भावनेने जनसेवा करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचे आकाली निधन झाले. त्यामुळे सांगलीतील जनतेची नाळ अन् सर्वसामान्य जनतेचे भान असलेल्या नेत्याची मोठी पोकळी निर्माण झाली. तोपर्यंतच्या राज्याच्या राजकारणात राजकीय पक्ष वेगळे असलेतरी सांगलीचे जयंतराव पाटील यांच्यासह किमान तीन ते चार मंत्री सांगलीचे हमखास असायचे.

गेल्या सहा दशकापासून सांगली जिल्ह्यातील नेत्यांचा राज्याच्या राजकारणात दबदबा कायम राहिला. त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे काही अपवाद वगळता बहुतेक नेत्यांना राजकीय कौटुंबिक वारसा नव्हता. प्रत्येक नेता गावचा सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य ते आमदार आणि पुढे स्वकर्तृत्वावर मंत्री ते मुख्यमंत्री झाले होते. याच जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेत्यांच्या साखळीतील आणखी एक रत्न ३१ जानेवारीला निखले. ते म्हणजे दुष्काळासाठी वरदान ठरणारी, पण दिवास्वप्न वाटणारी टेंभूची योजना वास्तवात आणणारे अनिलभाऊ बाबर.

विटयाजवळील गार्डी गावचे सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य ते सभापती, नागेवाडी येथील यशवंतराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष असा प्रदीर्घ अनुभव असलेले. ग्रामीण भागाची नाळ माहिती असलेले जिल्ह्यातील आमदार. विधानसभेतील २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असतानाही त्यांना अनेकदा मंत्रिपदाने हुलकावणी दिली. आता त्यांच्या अचानक जाण्याने सर्वसामान्य जनतेसह सांगली जिल्ह्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा ते शेवटचे नेते अनिल बाबर यांच्या जाण्याने सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान आजच्या तरुण पिढीतील युवा नेत्यांपुढे आहे. त्यांनी केवळ राजकीय वारसादार न होता, या दिग्गज नेत्याचा सामाजिक कार्यासाठीचा त्याग आणि समर्पित भाव हे गुण घेतले तर सांगली जिल्ह्याचे भविष्य उज्ज्वल असेल, अशी आशा करुया.

Web Title: The challenge to young leaders is to fill the void of veteran leaders in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.