Sangli: गव्याच्या पिल्लाचे पायाचे हाड मोडले; यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रेडिओ कॉलर लावून नैसर्गिक अधिवासात सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:54 IST2025-12-25T18:54:09+5:302025-12-25T18:54:23+5:30
वन्यजीव संवर्धनाच्या यशोगाथेचे प्रतीक

Sangli: गव्याच्या पिल्लाचे पायाचे हाड मोडले; यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रेडिओ कॉलर लावून नैसर्गिक अधिवासात सोडले
विकास शहा
शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या इतिहासात वाघिणींनंतर आता एका गव्याला रेडिओ कॉलर लावून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या एका गव्याच्या पिल्लावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याचा हा प्रेरणादायी प्रवास वन्यजीव संवर्धनाच्या यशोगाथेचे प्रतीक ठरत आहे.
सप्टेंबर २०२३ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथे एका नाल्यात गव्याचे पिल्लू पडलेले आढळून आले.यावेळी रेस्कु टीमने हे पिल्लू गंभीर जखमी असल्याने पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होते. याठिकाणी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता पायाला गंभीर दुखापत होऊन पायाचे हाड मोडल्याचे निष्पन्न झाले.
गव्याचा पाय हा मुख्य अवयव आहे कारण त्याच्यावर अजस्त्र वजनाचे शरीर पेलून उभा राहू व चालू शकतो. त्यामुळे पाय न कापता शस्त्रक्रिया करून पाय दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली व ती यशस्वी झाली.एक वर्षात हा गवा व्यवस्थित होऊन पायावर चालू लागला.यावेळी याठिकाणी त्याच्या नैसर्गिक स्वभाव वैशिष्टात फरक होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली त्यासाठी त्याला मानवी हालचाली पासून दूर ठेवण्यात आले होते.
आता या गव्याचे वजन १८० किलो झाले आहे. व्याघ्र प्रकल्प आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट' यांच्यात झालेल्या सामंजस कराराप्रमाणे पशुवैद्यकीय सहाय्य पुरवण्यात आले आहे. याचबरोबर त्यास पिंजऱ्यात बंद न ठेवता त्यास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात रेडिओ कॉलर बसवून सोडण्यात आले आहे. या द्वारे पुन्हा त्याचे नैसर्गिक जंगली स्वभाव वैशिष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.व्याघ्र प्रकल्पात सोडल्याने त्यास नैसर्गिक अधिवास हि मिळाला आहे. आता रेडिओ कॉलर द्वारे या गव्याच्या हालचाली टिपण्यात येणार आहेत.
या प्रक्रियेत सह्याद्री व्याघ्र राखीव चे क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण, उपसंचालक चांदोली विभाग स्नेहलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील चांदोली वनपरीक्षेत्र अधिकारी ऋषिकेश पाटील, पुणे रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट' यांनी मोलाची भूमिका बजावली.
संवर्धनासाठी हातात हात
'सह्याद्री' आणि 'रेस्क्यू ट्रस्ट'चा महत्त्वपूर्ण करार वन्यजीव व्यवस्थापनासाठी 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्प' आणि 'रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट' यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार केवळ वन्यप्राण्यांवर उपचारच नाही, तर परिसरातील पाळीव पशूंची सुरक्षा आणि तातडीची पशुवैद्यकीय मदत यासाठी दोन्ही संस्था एकत्रितपणे काम करणार आहेत. या उपक्रमातून वन्यजीव संवर्धनाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीवचे क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण व पुणे येथील रेस्कु चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नेहा पंचमिया यांनी दिली.