मिरज पोलीस ठाण्याशेजारील पोलीस उपनिरीक्षकाचा बंगला फोडला, नागरिकांत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 20:41 IST2022-12-26T20:40:10+5:302022-12-26T20:41:25+5:30
शीतल पाटील सांगली - मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याशेजारी असलेला पोलीस उपनिरीक्षकाचा बंगला चोरट्याने फोडला; मात्र चोरट्यास बंगल्यात ...

मिरज पोलीस ठाण्याशेजारील पोलीस उपनिरीक्षकाचा बंगला फोडला, नागरिकांत खळबळ
शीतल पाटील
सांगली - मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याशेजारी असलेला पोलीस उपनिरीक्षकाचा बंगला चोरट्याने फोडला; मात्र चोरट्यास बंगल्यात कोणताही मौल्यवान ऐवज सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस उपअधीक्षक कार्यालयात काम करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाचा महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याशेजारीच बंगला आहे. संबंधित उपनिरीक्षक काही दिवसांपूर्वी उमराह यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेले आहेत. त्यांचा मुलगा व सून तीन दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील मित्राकडे गेल्यानंतर घरावर पाळत ठेवलेल्या चोरट्याने शनिवारी मध्यरात्री बंगल्याचा मागील दरवाजा फोडून आत प्रवेश केला. चोरट्याने बंगल्यातील कपाटे फोडून त्यातील साहित्य विस्कटून दागिने व रोख रक्कमेची शोधाशोध केली; मात्र किमती ऐवज सापडला नसल्याने चोरट्याने तेथे बसून मद्यपान केले. किचनमधील खाद्यपदार्थांवर ताव मारला. त्यानंतर चोरट्याने तेथून पलायन केले.
रविवारी शेजाऱ्यांना बंगल्याच्या मागील दरवाजा उघडा असल्याचे दिसले. याबाबत उपनिरीक्षकाच्या मुलास माहिती दिल्यानंतर तो घरी परतला. यावेळी घर फोडून चोरट्यांनी साहित्य विस्कटल्याचे निदर्शनास आले. घरात शिरलेल्या एका चोरट्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रण झाले आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याशेजारी पोलीस उपनिरीक्षकाचाच बंगला फोडल्याच्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली.