Atpadi Municipal Council Election Results 2025: भाऊ हरला, बहीण नगराध्यक्ष झाली, आटपाडीच्या लेकीचा पंढरीत जयघोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 19:00 IST2025-12-22T18:57:14+5:302025-12-22T19:00:13+5:30
बहिणीच्या विजयाचा आनंद अधिक

Atpadi Municipal Council Election Results 2025: भाऊ हरला, बहीण नगराध्यक्ष झाली, आटपाडीच्या लेकीचा पंढरीत जयघोष
लक्ष्मण सरगर
आटपाडी : राजकारण हे केवळ आकड्यांचे, सत्तेचे किंवा पदांचे गणित नसते; कधी कधी ते रक्ताच्या नात्यांवर, त्यागावर आणि अश्रूंवर उभे असते. आटपाडी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत असेच एक हळवे चित्र राज्यासमोर आले. सख्ख्या भाऊ-बहिणीने एकाच वेळी दोन वेगवेगळ्या रणांगणांत उडी घेतली. आटपाडी नगरपंचायतीत भावाचा पराभव झाला, पण बहिणीला पंढरीचे नगराध्यक्षपद लाभले.
आटपाडीची लेक प्रणिती भालके हिने विठुरायाच्या पंढरीत नगराध्यक्षपदाचा मान पटकावत इतिहास रचला. त्याचवेळी, आटपाडीच्या पहिल्या नगरपंचायतीत नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरलेला लहान भाऊ पै. सौरभ पाटील पराभूत झाला. बहिणीच्या विजयाचा जल्लोष आणि भावाच्या पराभवाची शांत वेदना या दोन भावना एकाच कुटुंबात, एकाच वेळी उमटल्या.
विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून दोघांनी लढत दिली होती. त्यामुळे ही लढत केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक यात्राच ठरली. प्रणिती भालके या आटपाडीतील दिवंगत जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ पाटील यांच्या भावाची लेक. आटपाडीतला वारसा घेऊन दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या त्या सून झाल्या. भारत नाना भालके यांच्या निधनानंतर त्या केवळ सून म्हणून नव्हे, तर त्यांच्या विचारांची वारसदार म्हणून पुढे आल्या.
प्रणिती या पंढरपूरच्या नगराध्यक्षपदासाठी, तर पै. सौरभ पाटील आटपाडीच्या नगराध्यक्षपदासाठी एकाचवेळी रिंगणात उतरले. निकाल मात्र दोघांसाठी वेगळा ठरला. आटपाडीत भावाला पराभव पत्करावा लागला, पण पंढरपूरमध्ये बहिणीने विजयाची पताका फडकवली. त्याक्षणी एका घरात आनंदाचा जल्लोष होता, तर त्याच घरात शांतपणे स्वीकारलेली हारही होती. पराभवाच्या क्षणी भावाने बहिणीच्या विजयासाठी टाळ्या वाजवल्या. हीच या निवडणुकीची खरी गोष्ट ठरली.
नात्यांच्या ताकदीची साक्ष
आज पाटील–भालके कुटुंबातील एक लेक विठुरायाच्या नगरीचे नेतृत्व करते आहे, तर दुसरा मुलगा आटपाडीच्या राजकारणात अनुभवाची शिदोरी घेऊन उभा आहे. ही लढत कुणाच्या विजयाची किंवा पराभवाची नसून, नात्याच्या ताकदीची साक्ष ठरत आहे.
बहिणीच्या विजयाचा आनंद अधिक
भाऊ-बहिणीच्या या राजकीय प्रवासात अखेर बहिणीने बाजी मारली असली, तरी या लढतीने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक हळवी, माणुसकीची किनार नक्कीच दिली आहे. पराभवाच्या दु:खापेक्षा बहिणीच्या विजयाचा आनंद भावाच्या चेहऱ्यावर अधिक दिसून आला.