Sangli Municipal Election 2026: भाजपमध्ये 'शह-काटशह'चे राजकारण रंगले; देशपांडे प्रभारी, शेखर इनामदारांना झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:34 IST2025-12-19T17:33:55+5:302025-12-19T17:34:30+5:30
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पुन्हा गटबाजीची चर्चा रंगली

Sangli Municipal Election 2026: भाजपमध्ये 'शह-काटशह'चे राजकारण रंगले; देशपांडे प्रभारी, शेखर इनामदारांना झटका
सांगली : महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत भाजपकडून निवडणूक प्रभारीपदी पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची निवड प्रदेश उपाध्यक्ष तथा शहर निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांना शह मानला जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पुन्हा गटबाजीची चर्चा रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीपासून शहरातील भाजप आमदार सुधीर गाडगीळ व प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्यात विभागली आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीतून नेतेमंडळी आयात करून आपला गट मजबूत करण्याचाही प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर आमदार गाडगीळ यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांवरील अन्यायाचा मुद्दा उपस्थित करीत भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना दणका दिला होता. या वादावर अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पडदा टाकला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबर रोजी प्रदेश भाजप कार्यालयाकडून निवडणूक प्रमुख, प्रभारी निवडले गेले. सांगली शहर निवडणूक प्रमुख म्हणून शेखर इनामदार, सांगली ग्रामीण निवडणूक प्रमुख आमदार सत्यजित देशमुख यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून आमदार सुरेश खाडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.
आमदार गाडगीळ यांच्या लेटर बाॅम्बनंतर शेखर इनामदार गट काहीकाळ बॅकफूटवर गेला होता. पण, निवडणूक प्रमुखपदी निवड होताच इनामदार गट आक्रमक झाला होता. दरम्यान, महापालिका निवडणुकीत पक्षाचे धोरण, जाहीरनामा, पक्षात समन्वय ठेवणे, उमेदवारी निवड यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाच जणांची समिती स्थापन केली. त्यात आ. खाडे, आ. गाडगीळ, इनामदार, देशपांडे आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचा समावेश केला. भाजप एकोप्याने महापालिका निवडणुकीला सामोरे जात असल्याचे चित्र निर्माण झाले.
मात्र, आता ऐन निवडणुकीच्या धामधुमीत निवडणूक प्रभारीपदी मकरंद देशपांडे यांची निवड झाली. देशपांडे यांची निवड होताच आमदार गाडगीळ समर्थकांनी अभिनंदनाच्या पोस्ट व्हायरल केली. देशपांडे याची निवड इनामदार यांना शह मानला जात आहे. तशी पक्षात कुजबुज सुरू आहे.