Sangli: खानापुरात विद्यापीठ उपकेंद्राच्या हालचाली अद्याप थंडच, विधानसभेत केली होती घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 19:31 IST2025-11-03T19:31:14+5:302025-11-03T19:31:45+5:30
यावर्षी विद्यापीठाचे उपकेंद्र चालू होणार का याबाबत साशंकता

Sangli: खानापुरात विद्यापीठ उपकेंद्राच्या हालचाली अद्याप थंडच, विधानसभेत केली होती घोषणा
संदीप माने
खानापूर : महाराष्ट्र शासनाने खानापूर येथे मंजूर केलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचे कामकाज या वर्षीपासून सुरू होण्याची आशा होती; मात्र अद्यापही हे उपकेंद्र सुरू करण्याच्या हालचाली थंडच दिसून येत आहेत.
विद्यापीठाचे उपकेंद्र या परिसरात व्हावे यासाठी या परिसरातील युवकांनी वेगवेगळ्या माध्यमातून जन चळवळ उभारली होती. मार्च महिन्यामध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली होती. उपकेंद्रासाठी निधीही मंजूर केल्याची घोषणा केली होती. विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा जुलै महिन्यामध्ये खानापूर येथे नागरी सत्कार केला होता.
त्यावेळी बोलताना त्यांनी लवकरच विद्यापीठ उपकेंद्राचे कामकाज चालू होईल, अशी घोषणा केली होती. त्यामुळे आवश्यक त्या प्रक्रिया राबवून चालू शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यापीठ उपकेंद्राचे कामकाज चालू होईल, अशी आशा या परिसरातील शिक्षणप्रेमींना होती. तात्पुरते कामकाज चालू करण्यासाठी या परिसरात असणाऱ्या टेंभू योजनेची इमारत, महात्मा गांधी विद्यालयाची इमारत व अपेक्स पब्लिक स्कूलच्या इमारतीची विद्यापीठाच्या समिती मार्फत पाहणी केली होती.
मात्र यानंतर कोणतीच शैक्षणिक प्रक्रिया राबवण्यात न आल्याने यावर्षी विद्यापीठाचे उपकेंद्र चालू होणार का याबाबत साशंकता आहे. शासनाने आवश्यक त्या प्रक्रिया राबवून पुढील शैक्षणिक वर्षात तरी हे विद्यापीठाचे उपकेंद्र चालू करून शैक्षणिक कामकाज चालू करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
विद्यापीठ उपकेंद्राचे कामकाज यावर्षीपासून चालू होईल अशी अपेक्षा होती. वेगवेगळ्या समितींच्या मार्फत पाहणी ही करण्यात आलेली आहे; मात्र याबाबतच्या हालचाली संथ गतीने चालू असल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन विद्यापीठ उपकेंद्राचे कामकाज लवकर चालू करण्याची मागणी करणार आहोत.- अक्षय भगत, विद्यापीठ उपकेंद्र जन चळवळ, प्रतिनिधी