आमच्या हिंदुत्वाच्या धास्तीने ठाकरे बंधू एकत्र येताहेत, मंत्री नितेश राणेंनी सोडलं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:22 IST2025-06-06T18:21:02+5:302025-06-06T18:22:20+5:30
जतला लाल दिव्याची गाडी

आमच्या हिंदुत्वाच्या धास्तीने ठाकरे बंधू एकत्र येताहेत, मंत्री नितेश राणेंनी सोडलं टीकास्त्र
उमदी : ज्यांनी-ज्यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांची आजची परिस्थिती पूर्ण महाराष्ट्र पाहत असून, आमच्या हिंदुत्वाची धास्ती घेत दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, असे मत मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.
उमदी येथे संजय तेली यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. राणे म्हणाले की, दोन ठाकरे बंधू हिंदुत्वासाठी वेगळे झाले नाहीत अथवा हिंदुत्वासाठी एकत्र येत नाहीत, तर ते आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी एकत्र येत आहेत.
आज संपूर्ण महाराष्ट्रात एकच हिंदुत्वाचा ब्रँड आहे तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रात आता पवार व ठाकरे उरले आहेत का? अजित पवार यांना पवार ब्रँड मोठा करायचा असेल तर हिंदुत्वाच्या जवळ यावेच लागेल. ही महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची परिस्थिती आहे. गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हिंदुत्वाचा विचार पसरवत असून, जिहादी विरोधात स्पष्ट भूमिका मांडत आहेत.
पडळकर म्हणाले की, उमदी येथे मंजूर झालेल्या औद्योगिक वसाहतीत एखादी मोठी कंपनी देऊन अनेक युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी राणे यांनी प्रयत्न करावेत. यावेळी राणे, पडळकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, डॉ. रवींद्र अरळी, आप्पू पट्टणशेट्टी यांनी संजय तेली यांचा सत्कार केला.
जतला लाल दिव्याची गाडी
संजय तेली म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मंत्रिपदाचा व डॉ. रवींद्र अरळी यांना विधान परिषद सदस्यपदाचा उल्लेख केला. हाच धागा पकडत राणे यांनी लवकरच जतला लाल दिव्याची गाडी मिळेल असा विश्वास दिला.