Sangli: बिबट्यांच्या भीतीने शिराळा तालुक्यात शेतातील घरांना दहा फूट उंच तारांचे कुंपण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 18:39 IST2025-12-27T18:38:35+5:302025-12-27T18:39:21+5:30
नागरिक घेताहेत दक्षता

Sangli: बिबट्यांच्या भीतीने शिराळा तालुक्यात शेतातील घरांना दहा फूट उंच तारांचे कुंपण
सहदेव खोत
पुनवत : शिराळा तालुक्यात बिबट्या तसेच अन्य हिंस्र वन्य प्राण्यांचा वावर प्रमाणाबाहेर वाढला आहे. हे प्राणी आता लोकवस्तीच्या अगदी जवळ वावरत आहेत. शेतातील घरांना या प्राण्यांचा फार धोका निर्माण झाला आहे. या धोक्यापासून बचाव करण्यासाठी आता नागरिकच काळजी घेताना दिसत आहेत. शेतातील अनेक घरांना आता तारांचे दहा फूट उंच कुंपण घातले जाऊ लागले आहे.
शिराळा तालुक्यात आता बिबटे घराघरांपर्यंत पोहोचले आहेत. गावांच्या आजूबाजूला असलेल्या उसाच्या फडात बिबट्यांचे वास्तव्य आहे. ऊस हाच बिबट्यांचा अधिवास बनला आहे. रात्रीच्या वेळेला हे बिबटे अगदी लोकवस्तीमध्ये फिरत आहेत. शेतालगत असलेल्या घरांना याचा विशेष धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना या बिबट्यांची भीती वाटत आहे.
त्यातच परिसरात पाळीव जनावरे, कुत्री यासह माणसांवरच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाकडून ठोस काही होत नसल्याने आता नागरिकच सावध झाले आहेत. स्वसंरक्षणासाठी उपाययोजना कराव्या लागत आहेत. मेंढपाळांना तर रात्री शेतात सौरदिवे लावावे लागत आहेत. जागरण करावे लागत आहेत.
हे केले आहेत उपाय
- वस्तीच्या बाहेर रात्रभर विजेचा दिवा.
- शेतातील घरांना तारांचे कुंपण.
- जनावरांच्या वस्त्या बंदिस्त.
- रात्री शेतात टॉर्च, काठी व ध्वनिनिक्षेपकांचा वापर.
- रात्री निर्जन रस्त्यावरून प्रवास करताना हॉर्न वाजवणे
आम्ही शेतात नवीन घर बांधले आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून घराच्या सभोवताली तारेचे कुंपण केले आहे. यासाठी खर्चाचा भुर्दंड बसला आहे. - शिवाजी शेळके, ग्रामस्थ, पुनवत