दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:04 IST2025-12-21T16:01:22+5:302025-12-21T16:04:07+5:30
Tasgaon Nagar Parishad Election Result 2025: तासगावातील पोस्टर बॉईजचा पंचनामा सुरू करणार, असा इशारा संजयकाका पाटील यांनी विजयानंतर दिला.

दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
Tasgaon Nagar Parishad Election Result 2025: राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या एकूण २८८ सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मतदान झाले. या सगळ्याचे निकाल हाती येत आहेत. काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसत आहे, तर काही ठिकाणी गड राखण्यात यश येत आहे. तासगाव नगर परिषदेत माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दोन निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अखेर संजयकाका पाटील यांनी मैदान मारले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेर तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत संजयकाका पाटील यांनी बाजी मारली. तासगाव नगर परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर संजयकाका पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत.
पोस्टर बॉईजचा पंचनामा सुरू करणार
संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडी तासगाव नगर परिषदेवर सत्ता मिळवली आहे. विजयानंतर संजय काकांनी विरोधी गट असलेल्या आमदार रोहित पाटील गटावर टीका केली. तासगावातील पोस्टर बॉईजचा पंचनामा सुरू करणार, असा इशारा संजय काका पाटील यांनी दिला. तासगावातील विजय रॅलीत आमदार रोहित पाटील यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. काकांना संपवण्याचा काहींचा प्रयत्न होता. मात्र, जनतेने हे काय होऊ दिले नाही, असेही संजयकाका पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजया बाबासाहेब पाटील यांचा विजय झाला. एकूण २४ जागांपैकी १३ जागांवर संजयकाका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीला विजय मिळाला, तर ११ जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.