Sangli: इस्लामपूरच्या ‘ईश्वरपूर’ नामांतराला केंद्राचा हिरवा कंदिल, अधिसूचनेची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:14 IST2025-10-25T13:13:42+5:302025-10-25T13:14:09+5:30
सर्वेक्षण करुन प्रस्तावाला तांत्रिक मान्यता

Sangli: इस्लामपूरच्या ‘ईश्वरपूर’ नामांतराला केंद्राचा हिरवा कंदिल, अधिसूचनेची प्रतीक्षा
इस्लामपूर : इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ नामांतर करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला भारतीय सर्वेक्षण विभागाने हिरवा कंदील दर्शवला आहे. तांत्रिक मान्यता देताना नाव बदलाचे गॅझेट सादर करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच गॅझेट प्रसिद्ध होऊन शासकीय दफ्तरी व व्यवहारात ‘ईश्वरपूर’ या नावाचा अधिकृत वापर सुरू होणार आहे.
इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतर करण्याचा ठराव सुरुवातीला नगर परिषदेने केला होता. राज्य शासनाने नुकताच नामांतराचा निर्णय घेत त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला होता. गृह मंत्रालयाने याबाबतचा प्रस्ताव भारतीय सर्वेक्षण विभागास पाठविला होता. त्यानुसार सर्वेक्षण विभागाने आवश्यक भू-स्थानिक पडताळणी केली असून प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
याबाबत विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव, महाराष्ट्र व गोवा भू-स्थानिक निदेशालयाचे निदेशक यांना पत्र पाठवून नामांतराला हिरवा कंदील दर्शवला आहे. याबाबतचे गॅझेट नोटीफिकेशन करून त्याची प्रत सादर करण्याचे आवाहनही पत्राद्वारे केले आहे.
केंद्र शासनाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर इस्लामपूर मतदारसंघात भाजपा व महायुतीच्या नेत्यांनी स्वागत केले. ईश्वरपूर नामांतरावरून बराच राजकीय वाद झाला. एकीकडे ईश्वरपूर नामांतर होत असताना स्थानिक अनेक नेत्यांनी व नागरिकांनी उरुण ईश्वरपूर नामांतरासाठी आग्रह धरला आहे. केंद्र शासनाच्या प्रस्तावात मात्र केवळ ईश्वरपूर असाच उल्लेख आहे.
ऐतिहासिक निर्णय : सम्राट महाडिक
भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक म्हणाले, ही केवळ नाव बदलाची घटना नाही, तर शहराच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ओळखीचा सन्मान आहे. उरूण ईश्वरपूर हे नाव आपल्या परंपरेशी आणि श्रद्धेशी जोडलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इस्लामपूरचे नाव बदलून उरूण ईश्वरपूर करावे, अशी मागणी सातत्याने नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध राजकीय नेत्यांकडून होत होती. अखेर ही ऐतिहासिक मागणी पूर्ण झाली आहे.
विरोधकांकडून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न !
सम्राट महाडिक म्हणाले, विरोधकांकडून इस्लामपूर शहराच्या नामांतराबाबत संभ्रम पसरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारने इस्लामपूरचे ‘ईश्वरपूर’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आता राज्य शासन व नगरविकास विभागाकडून पुढील प्रक्रिया येत्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहराचे अधिकृत नामकरण ‘उरूण ईश्वरपूर’ असे होणार असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
इस्लामपूरचे ईश्वरपूर करण्याची शासनाकडून अद्याप अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही. केंद्र सरकारने इस्लामपूरचा अर्थ ईश्वरपूर असा आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच शहराचे नाव बदलू शकते. - अशोक काकडे, जिल्हाधिकारी, सांगली