पुनवत येथे बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, नेमके कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 15:41 IST2023-04-27T15:41:00+5:302023-04-27T15:41:16+5:30
बारावीची परीक्षा दिली होती

पुनवत येथे बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, नेमके कारण अस्पष्ट
शिराळा / पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथील मनौती मारुती शेळके (वय १८) या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. बुधवार, दि. २६ रोजी सकाळी साडेआठ ते दहाच्या दरम्यान ही घटना घडली.
पुनवत येथे मारुती आनंदा शेळके यांचे कुटुंब राहते. मारुती यांना चार मुली व एक मुलगा आहे. मनौती ही सर्वात मोठी मुलगी. मनौतीचे आजोळ पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी हे असून, तेथील शाळेतून तिने बारावीची परीक्षा दिली.
बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास मारुती व त्यांची पत्नी शेतात गेले होते. इतर भावंडे शाळेत गेली होती. घरी कोणी नसल्याचे पाहून मनौतीने घराचे दरवाजे बंद करून गळफास लावून घेतला. शेतात गेलेल्या आई-वडिलांना काही वेळानंतर ही घटना समजली. त्यांनी घराकडे धाव घेतली.
पोलिस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर, भाऊसाहेब कुंभार, स्नेहल कुंभार, नितीन घोरपडे व पोलिस पाटील बाबासाहेब वरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत मारुती शेळके यांनी वर्दी दिली.