सांगली जिल्ह्यात साखरेचे उत्पादन १९ लाख क्विंटलने घटले, गळीत हंगामाची सांगता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:42 IST2025-03-26T18:38:47+5:302025-03-26T18:42:05+5:30
साखर उताऱ्यातही घट : दीड महिन्यापासून शेतकऱ्यांना बिल मिळाले नाहीत

सांगली जिल्ह्यात साखरेचे उत्पादन १९ लाख क्विंटलने घटले, गळीत हंगामाची सांगता
अशोक डोंबाळे
सांगली : जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी ७७ लाख ६ हजार ३६४ टन उसाचे गाळप करून ८१ लाख ४६ हजार ५४० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. पण, २०२३-२४ च्या गळीत हंगामाच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये १८ लाख ९५ हजार ३४६ क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील कारखान्यांच्या सरासरी साखर उताऱ्यातही ०.६६ टक्के घट झाली आहे. दरम्यान, कारखान्यांचे गळीत हंगाम संपले तरीही गेल्या दीड महिन्यापासून उसाची बिले शेतकऱ्यांना मिळाली नसल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी २०२३-२४ च्या गळीत हंगामामध्ये ८८ लाख ८३ हजार २४५ टन उसाचे गाळप करून १ कोटी ४१ हजार ८८६ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. साखरेचा सरासरी उतारा ११.१२ टक्के होता. २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्येही जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होते. पण, उसाची उपलब्धता कमी झाल्यामुळे त्याचा कारखान्यांच्या गाळपावर परिणाम झाला आहे.
सर्वच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. या कारखान्यांनी ७७ लाख ६६ हजार ३६४ टन उसाचे गाळप झाले असून ८१ लाख ४६ हजार ५४० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास १८ लाख ९५ हजार ३४६ क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. २०२३-२४ मध्ये साखरेचा सरासरी उतारा ११.१२ टक्के असून यामध्ये ०.६६ टक्क्यांनी घट होऊन २०२४-२५ च्या गळीत हंगामात १०.४६ टक्के राहिला आहे. साखर उतारा घटल्यामुळे त्यांचा परिणाम एफआरपी निश्चित करण्यावर होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
साखर कारखान्यांचे गळीत हंगाम संपले आहेत. तरीही बहुतांशी कारखान्यांनी १ फेब्रवारी ते २५ मार्चपर्यंत गाळपास गेलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांना दिली नाहीत. ही रक्कम ४०० ते ५०० कोटींहून जास्त असण्याची शक्यता आहे.
कारखान्यांची बिल न मिळाल्यामुळे कर्ज थकबाकीत : संदीप राजोबा
साखर कारखान्यांनी ऊस गळितास गेल्यापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत. पण, कारखान्यांचे गळीत हंगाम संपले तरीही शेतकऱ्यांना गेल्या दीड महिन्यापासून पैसेच दिले नाहीत. शेतकऱ्यांची कर्ज थकबाकीत गेल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा आणखी वाढणार आहे. यास साखर कारखानदार जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केली.