..अखेर दादर-हुबळी एक्स्प्रेसला सांगलीतील किर्लोस्करवाडीत थांबा, प्रवासी संघटनांच्या प्रयत्नांना यश

By अविनाश कोळी | Updated: July 4, 2024 16:10 IST2024-07-04T16:09:49+5:302024-07-04T16:10:12+5:30

मिरज : रेल्वेने ७ जुलैपासून प्रायोगिक तत्त्वावर दादर-हुबळी-दादर एक्स्प्रेसला किर्लोस्करवाडी स्थानकात थांबा दिला आहे. ७ जुलै रोजी हुबळी येथून ...

Stop Dadar-Hubli Express at Kirloskarwadi in Sangli, Success to the efforts of travel associations | ..अखेर दादर-हुबळी एक्स्प्रेसला सांगलीतील किर्लोस्करवाडीत थांबा, प्रवासी संघटनांच्या प्रयत्नांना यश

..अखेर दादर-हुबळी एक्स्प्रेसला सांगलीतील किर्लोस्करवाडीत थांबा, प्रवासी संघटनांच्या प्रयत्नांना यश

मिरज : रेल्वेने ७ जुलैपासून प्रायोगिक तत्त्वावर दादर-हुबळी-दादर एक्स्प्रेसला किर्लोस्करवाडी स्थानकात थांबा दिला आहे. ७ जुलै रोजी हुबळी येथून सुटणारी दादर-हुबळी एक्स्प्रेस रात्री ९:५८ वाजता किर्लोस्करवाडी स्थानकात पोहोचेल. रात्री १० वाजता सुटेल. त्याचदिवशी दादर येथून सुटणारी दादर-हुबळी एक्स्प्रेस किर्लोस्करवाडी स्थानकात ४:१८ वाजता पोहोचेल. ४:२० वाजता सुटेल. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी केले आहे.

रेल्वे बोर्डाने १४ मार्च रोजी दादर-हुबळी एक्स्प्रेसला किर्लाेस्करवाडीत थांबा मंजूर केला होता. मंजुरीचे अधिकृत पत्र येऊनही मध्य रेल्वेकडून थांबा लवकर न दिल्याने प्रवासी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. किर्लोस्करवाडी व सांगली येथील प्रवासी संघटनांनी चार महिन्यांपासून वेळोवेळी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून दादर-हुबळी एक्स्प्रेसचा किर्लोस्करवाडी थांबा सुरू करण्याची विनंती केली; पण प्रतिसाद मिळाला नाही. 

त्यामुळे सहा दिवसांत थांबा सुरू झाला नाही, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किर्लोस्करवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे चंद्रकांत जाधव, राजाभाऊ माने, जीवन नार्वेकर, डाॅ. चंद्रशेखर माने, अजित लेंगरेकर यांनी दिला होता. अखेर प्रवासी संघटनांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून येत्या ७ जुलैला किर्लोस्करवाडीच्या सेवेत ही गाडी रुजू होणार आहे.

Web Title: Stop Dadar-Hubli Express at Kirloskarwadi in Sangli, Success to the efforts of travel associations