Sangli: वॉचमनच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत रोवला यशाचा झेंडा, सृष्टीने मिळवले ९७.४० टक्के गुण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 18:03 IST2025-05-14T18:01:32+5:302025-05-14T18:03:22+5:30
दिवसभर ड्युटी करून आलेल्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

Sangli: वॉचमनच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत रोवला यशाचा झेंडा, सृष्टीने मिळवले ९७.४० टक्के गुण
प्रताप महाडिक
कडेगाव (जि. सांगली) : परिस्थिती कितीही कठीण असली अन् वाटेत कितीही अडथळे आले तरी कष्टाच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते. ही गोष्ट चिंचणी (ता. कडेगाव) येथील शिवाजी हायस्कूलची विद्यार्थिनी सृष्टी अनिल महाडिक हिने सत्यात उतरविली आहे. दहावीच्या परीक्षेत ९७.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात तिने प्रथम क्रमांक पटकावला.
सृष्टीचे वडील अनिल महाडिक हे सोनहिरा सहकारी साखर कारखान्यात वॉचमन म्हणून कार्यरत आहेत. पूर्वीची शेती तलावासाठी संपादित झाली. उरलेली थोडीशी शेती आणि वडिलांची वॉचमनची नोकरी यावर त्यांचे घर चालत होते. आई, वडील भावासह ११ जणांचे त्यांचे एकत्र कुटुंब आहे. आई दीपाली या गृहिणी असून, घरची जबाबदारी आणि शेतातली कामे दोन्ही सांभाळतात.
घरात यापूर्वी कोणाचेही उच्च शिक्षण झालेले नाही; पण मुलांमध्ये ज्ञानाची जिद्द आहे. सृष्टीची मोठी बहीण इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकते आणि आता सृष्टीने हे अपूर्व यश मिळवून महाडिक कुटुंबाच्या संघर्षावर सोनेरी झालर घातली आहे.
दिवसभर ड्युटी करून आलेल्या वडिलांच्या डोळ्यात मंगळवारी आनंदाश्रू तरळले. लेकीने गरिबीचे चटके सोसत मेहनतीने उजळून टाकलेलं स्वप्न त्यांचा ऊर अभिमानाने भरून टाकणारे ठरले. घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर तिने आनंद फुलवला. यशाचे इमले सर करीत तिने खूप मोठे व्हावे, असा आशीर्वाद तिच्या वडिलांनी तिला दिला.