पूराचे पाणी ओसरताच नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 11:56 PM2021-07-24T23:56:03+5:302021-07-24T23:56:43+5:30

Jayant Patil : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पूरसद्यस्थिती आढावा बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते.

As soon as the flood waters recede, make a panchnama of the loss - Jayant Patil | पूराचे पाणी ओसरताच नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा - जयंत पाटील

पूराचे पाणी ओसरताच नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा - जयंत पाटील

Next

सांगली : सध्या सांगलीत पाणीपातळी जवळपास 53 फूटापर्यंत आली असून मागच्या येणाऱ्या पाण्यामुळे सांगलीत पाणी वाढले आहे. दि. 25 जुलै च्या सकाळपर्यंत पाणी उतरेल. पाणी ओसरताच शेती, घरे आदि सर्वच बाबींच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा. पाणी ओसरताच आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक औषध फवारणी करा. पाण्याखाली गेलेल्या पाणीपुरवठा योजनांची त्वरीत दुरूस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करा. पूरप्रवण क्षेत्रातील अडकलेल्या लोकांना अडचणीच्या वेळी सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक तेथे रस्ते, पूल यांची उंची वाढविण्यासाठी आराखडे तयार करा, असे जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पूरसद्यस्थिती आढावा बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेूवार, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता मिलींद नाईक, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता काटकर, कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, 2019 च्या महापूरापेक्षा या काळात पडलेला पाऊस फार जास्त आहे पण सुदैवाने प्रशासनाने आदिपासूनच सर्व यंत्रणा सज्ज ठेवून लोकांचे स्थलांतरण केले. सद्या कोयना धरणातून 30 हजार तर कण्हेर, धोम, उरमोडी, तारळी या धरणांमधून 20 हजार क्युसेक्स विसर्ग आणि वारणेतून 16 हजार क्युसेक्स विसर्ग होत आहे. कोयना धरणात आत्तापर्यंतचे एका दिवसात 12 टीएमसी पाणीसाठ्याचे रेकॉर्ड होते. ते यावेळी 18 टीएमसी वर गेले आहे. सद्या तरी पावसाने उसंत दिली आहे. भविष्यात असाच पाऊस आला तर त्यासाठी अत्यंत नेटके नियोजन हवे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, दुधगाव, शिगाव आदि भागात पाणी पसरले असून सांगलीतही पाणी आले आहे. वारणेतून होणारा 28 हजार क्युसेक्स विसर्ग 16 हजारावर  करण्यात आला आहे. शक्य असल्यास तो आजच्या रात्री तोही थांबवावा, अशा सूचना जलसंपदा विभागाला  दिल्या असून सांगलीतील पाणी 8 ते 10 तासात ओसरेल, असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. 

तसेच पाणी ओसरताच यंत्रणांनी करावयाच्या सर्व उपाययोजना त्वरीत राबविण्याचे निर्देशही दिले. ज्या रस्त्यांवर पूराचे पाणी रस्ता ओलांडून पलीकडच्या बाजूला वाहून जाते अशी ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी पाणी निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सध्या जिल्ह्यात 94 गावे पूरबाधित असून 1 लाख 5 हजाराहून अधिक लोकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. तर 24 हजार जनावरांचेही स्थलांतरण करण्यात आले आहे. 60 शासकीय व 6 सामाजिक संस्थांची निवारा केंद्रे सुरू करण्यात आली असून यामध्ये साधारणत: 3 हजार 400 व्यक्तींनी आश्रय घेतला आहे. त्यांना मास्क, सॅनिटायझर, भोजन आदि सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. जवळपास 23 हजार 500 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, ऊस आदि पिकांना फटका बसला आहे. नुकसानीच्या अनुषंगाने पंचनाम्यासाठी पथके तयार करण्यात आली आहे. पूरबाधित क्षेत्रात आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. पाणी आलेल्या ठिकाणी रेखांकन करण्याच्या सूचनाही यंत्रणांना दिल्या आहेत. 

पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज दिवसभर वाळवा, शिगाव, कनेगाव, मौजे डिग्रज आदि भागातील पाणी आलेल्या ठिकाणी भेट दिली व पाहणी केली. सांगली शहरातही त्यांनी कापडपेठ, हरभट रोड, गणपती पेठ, बुरूड गल्ली, जुना स्टेशन या ठिकाणी पूरपरिस्थितीची पाहणी केली. तसेच सांगली महानगरपालिकेच्या वतीने स्थलांतरीत केलेल्या लोकांची महानगरपालिका शाळा क्र. 13 येथे भेट देवून विचारपूस करून दिलासा दिला.

Web Title: As soon as the flood waters recede, make a panchnama of the loss - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.