सापाच्या ५४ पिलांसाठी सांगलीतील सर्पमित्रांचे `सुईणपण`; कृत्रिमरीत्या अंडी उबवून दिला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 16:28 IST2026-03-25T16:27:34+5:302026-03-25T16:28:09+5:30
५४ पिले सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात

सापाच्या ५४ पिलांसाठी सांगलीतील सर्पमित्रांचे `सुईणपण`; कृत्रिमरीत्या अंडी उबवून दिला जन्म
संतोष भिसे
सांगली : आजवर हजारो सापांचा सुरक्षित बचाव करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडणारे सांगलीतील सर्पमित्र रविवारी (दि. २२) आणखी एका नयनमनोहर प्रसंगाचे साक्षीदार झाले. विरुळा जातीच्या बिनविषारी सापाच्या तब्बल ५४ पिलांना अंड्यातून जन्माला घालण्याचे सुईणपण त्यांनी निभावले. या पिलांना वनविभागाच्या मार्गदर्शनानुसार नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
सांगलीत कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळील पवार कॉलनीत एका शेतात २३ फेब्रुवारी रोजी खत टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी खताचा ढिगारा खणत असताना मजुरांना मातीत सुमारे दोन ते तीन फूट खाली साप दिसला. सोबतच्या अंड्यांना वेटोळे घालून तो बसला होता. शेतकरी इराप्पा माळी यांनी याची माहिती सर्पमित्र मंदार शिंपी व मेघदीप कुदळे यांना लगेच दिली. त्यांनी सापाला पकडून अंडीही ताब्यात घेतली.
सापाला सोडून दिले, पण अंड्यांचे काय करायचे? हा प्रश्न होता. सापाची अंडी कृत्रिमरीत्या उबवण्याचा अनुभव शिंपी यांना होता. त्यांनी वन विभागाच्या परवानगीने ती घरी नेली. प्लास्टिकच्या एका पारदर्शी बरणीत कोकोपीट व थोडी माती भरून त्यात अंडी ठेवली. तापमान राखण्यासाठी बरणीत दररोज थोडे-थोडे पाणी शिंपडले. अंड्यातून बाहेर येणाऱ्या पिलांसाठी बरणीवर दररोज लक्ष ठेवले.
अखेर रविवारी (दि. २२) अंड्यांतून ५४ पिले बाहेर आली. एकाही अंड्याचा किंवा पिलाचा मृत्यू झाला नाही. या पिलांना नैसर्गिक अधिवासात सोडले. या उपक्रमासाठी परिक्षेत्र वनरक्षक सर्जेराव सोनवडेकर, गणेश भोसले, सचिन साळुंखे, किरण नाईक आदींनी मार्गदर्शन केले.
नैसर्गिकरीत्या जन्माचाच अनुभव
मंदार शिंपी यांनी सांगितले की, सामान्यत: पाणी जवळ असलेल्या किंवा ओलाव्याच्या जागी साप अंडी घालतात. ऊन आणि पाणी या दोहोंचे संतुलन साधत अंड्यांचे तापमान नियंत्रित होते. ३५ ते ३७ अंश सेल्सिअस या तापमानाला अंडी फलित होतात. सर्रास साप अंडी घातल्यानंतर निघून जातात. तत्पूर्वी, अंड्यांना योग्य तापमान मिळविण्याचे नैसर्गिक ज्ञान त्यांना असते. हेच तापमान बरणीमध्येही कायम राखण्यात आले.
साप किंवा सापाची अंडी दिसली, की ती नष्ट करण्याचा लोकांचा कल असतो, पण सांगली परिसरात लोकांत जागृती करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. यामुळेच या सापाविषयी व त्याच्या अंड्यांविषयी माहिती मिळाली. अंडी नैसर्गिक प्रक्रियेनुसारच उबविण्यात यशस्वी झालो. - मंदार शिंपी, सर्पमित्र, सांगली.